
इंस्टाग्रामवर व्हिडीओ टाकत डुबक्या मारोती रस्त्यावरील झाडाला घेतला गळफास…
अमळनेर : प्रेयसीने नकार दिल्याने नैराश्यातून गांधली येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना क्रीडा संकुलाच्या शेजारी डुबक्या मारोती रस्त्यावर सकाळी १२ वाजेच्या सुमारास घडली.
गौरव रवींद्र बोरसे वय २१ रा गांधली या तरुणाने ६ रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास रस्त्यालगत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे , पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , हेडकॉन्स्टेबल विनोद भोई , हेडकॉन्स्टेबल मिलिंद बोरसे , विनोद संदानशिव यांनी भेट देऊन पंचनामा केला. गौरव चे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले.
दरम्यान गौरवच्या मित्रांनी त्याने गळफास घेण्यापूर्वी इंस्टाग्राम वर टाकलेला व्हिडीओ शोधून काढला असता गौरव ने त्याच्या आईला विनवणी केली आहे की आई तू माझ्या जाण्यानंतर रडू नको , मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही. माझे वडील माझ्यावर पैसे खर्च करायला नाही म्हणायचे. बाप्या ला शिकव , मित्रांना आवाहन करताना त्याने सांगितले की मित्रांनो प्रेम करू नका. आपापल्या अभ्यासात लक्ष ठेवा , मी एका मुलीवर प्रेम केले. आम्ही अल्पवयीन असताना लग्न केले होते. तिने मला नकार दिला , ती विसरून गेली माझे खरे प्रेम आहे मी जीवन संपवत आहे. मी आई वडिलांना सोडून जायला नको , मी जी चूक करत आहे ती तुम्ही करू नका..
चर्चेतून मिळालेली माहिती अशी की वय पूर्ण झाल्यावर गौरव ने त्याच्या प्रेयसीला आता आपण लग्न करू असे सांगितले असता तिने स्पष्ट नकार देऊन मी तुला विसरली असे सांगितल्याने त्यांचे वाद झाले आणि थोड्या वेळानंतर त्याने इंस्टाग्राम वर व्हिडीओ टाकला आणि नंतर झाडाला गळफास घेतला. भूषण हेमराज सूर्यवंशी याने खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.




