
अमळनेर : पारोळा तालुक्यातील देवगाव येथील एका व्यक्तीचे हरवलेले दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट चहावाल्याने प्रामाणिक पणे परत केले आहे.
अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील योगेश पाटील यांचे तहसील कार्यालयासमोर चहाचे दुकान आहे. सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्याठिकाणी देवगाव येथील विलास आत्माराम पाटील आणि त्यांचे नातेवाईक पिंगळवाडे येथील संदीप दगा पाटील हे दोघे चहा प्यायला तहसील कार्यालयासमोर आले. तेव्हा विलास पाटील यांच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट खाली पडले. चहाचे बिल देऊन ते निघून गेले. बऱ्याच वेळेनंतर ब्रेसलेट हरवल्याचे लक्षात येताच ते इतरत्र शोधत बसले. दुपारी ते कुठे सीसीटीव्ही कॅमेरे शोधत असतांना चहा विक्रेते योगेश पाटील यांनी काय शोधत आहेत म्हणून विचारल्यावर त्यांनी ब्रासलेट हरवल्याचे सांगताच योगेश पाटील यांनी ते येथे पडले होते असे सांगून तात्काळ काढून दिले. त्याच प्रमाणे निम येथील एका व्यक्तीचे एक हजार रुपये दुकानावर बसायच्या स्टूल वर राहून गेले होते. ते देखील योगेश ने काढून दिले. त्याच्या प्रमाणिकपणाचे खूप कौतुक होत आहे.




