
अमळनेर : पहिली ते चौथी एकही विद्यार्थी नसल्याने तालुक्यातील भोरटेक येथील जिल्हापरिषद शाळा बंद करण्याचा निर्णय गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी घेतला आहे.
भोरटेक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत २०२२ पासून फक्त तीन विद्यार्थिनी शिक्षण घेत होत्या. त्यादेखील भोरटेक येथील नव्हे तर मध्यप्रदेशातील पावरा समाजाच्या होत्या. या विद्यार्थिनी पहिलीपासून चौथीला आल्यानन्तर यावर्षी त्या मध्यप्रदेशात आपल्या पालकांबरोबर स्थलांतर झाल्या आहेत. गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, गटसमन्वयक रवींद्र पाटील आणि केंद्रप्रमुख दिलीप सोनवणे यांनी १६ ऑगस्ट रोजी भेट दिली असता एकही विद्यार्थी आढळून आला नाही. मुख्याध्यापक बापू काशिनाथ चव्हाण व शालेय समिती यांच्यासमक्ष पंचनामा केला. गावातील एकही विद्यार्थी गेल्या तीन वर्षात पहिलीला दाखल नाही. तसेच गावात सर्वेक्षण केले असता गावात ६ ते १४ वयोगटातील एकही बालक आढळून आला नाही. चौथी च्या वर्गात शिकत असलेल्या तिन्ही मुली ४ ऑगस्ट पासून कायमस्वरूपी मध्यप्रदेशांत स्थलांतरित झालेल्या असल्याचे आढळून आल्या. या शाळेवर दरवर्षी २५ लाख रुपये खर्च होत होता. शासनाचा पैसा वाचवण्यासाठी शून्य पटसंख्या असलेली शाळा बंद करण्याचा निर्णय गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी घेतला आहे. या शाळेवरील दोन शिक्षकांपैकी श्याम वाघ याना ९ ऑगस्टलाच मारवड बॉईज जिप शाळेत पाठवण्यात आले आहे. तर मुख्याध्यापक बापू चव्हाण यांना जैतपिर केंद्रात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळेच्या मालमत्तेचा पदभार जैतपिर केंद्राचे केंद्रप्रमुखांना देण्यात आला आहे. तसेच तिन्ही विद्यार्थिनींचे दाखले चिचपाणी निपाणी जिल्हा बडवाणी मध्यप्रदेश येथील जिल्हापरिषद शाळेत रवाना करण्यात आले आहेत.




