
मुदतीत निर्णय न कळविल्यास विशेष सभा घेऊन निवडणूक जाहीर करणार-अध्यक्ष जितेंद्र झाबक
खा.शि.मंडळाच्या कार्यालयात निवडणुकीसाठी सभासद झाले आग्रही
अमळनेर-खा शि मंडळाच्या निवडणूकीबाबत निर्णय घेण्यासाठी संचालक मंडळास 3 दिवसांची मुदत देण्यात आली असून दिलेल्या मुदतीत कोणताही निर्णय न कळविल्यास त्यानंतर विशेष सभा घेऊन निवडणूक जाहीर करणार अशी भूमिका अध्यक्ष जितेंद्र झाबक यांनी खा.शि.मंडळाच्या कार्यालयात सभासदांसमोर झालेल्या बैठकीत जाहीर केली.
यावेळी उपस्थित असलेले संस्थेचे माजी कार्याध्यक्ष, माजी अध्यक्ष माजी संचालक व सभासद निवडणुक जाहीर करण्यासाठी प्रचंड आग्रही झालेले होते.मात्र अध्यक्ष झाबक यांनी ही स्थिती गांभीर्याने हाताळत वरील प्रमाणे निर्णय जाहीर केला.यावेळी संस्थेच्या वतीने विद्यमान कार्याध्यक्ष, कार्योपाध्यक्ष व संपूर्ण कार्यकारिणी सदस्य अनुपस्थित होते,मात्र चिटणीस प्रा पराग पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी जैन यांनी उपस्थित राहून अध्यक्ष व व इतर उपस्थितांचे म्हणणे ऐकून घेतले.यावेळी अधिक झाबक बोलताना म्हणाले की विद्यमान कार्यकारी मंडळाची निवडणूक घेण्यासंदर्भात मी 3 पत्र चिटणीस यांना दिले असून याची कोणतीही दखल न घेतल्याने व कोणतीही चर्चा न केल्याने मी आता जाहीरपणे निवडणूक जाहीर करण्यासंदर्भात पत्र संस्थेला दिले आहे.मात्र कार्याध्यक्ष व चिटणीस यांनी आपली भूमिका बेकायदेशीर असल्याचे पत्र वृत्तपत्रामध्ये देऊन आपली मानहानी केली आहे.यामुळे त्यांनी वृत्तपत्राद्वारेच जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.यावर उपस्थित सभासदांनीही नाराजीचा सूर व्यक्त केला. सुरवातीला चिटणीस प्रा पराग पाटील यांनी प्रास्ताविक मांडताना काही निर्णय कोर्टात प्रलंबित असल्याने न्यायप्रविष्ट बाब म्हणून निवडणूक घोषित करणे कायदेशीर होणार नाही अशी भूमिका मांडली तर माजी चिटणीस म्हणून प्राचार्य ए बी जैन यांनी न्यायालयीन प्रक्रियेची माहिती देत सर्व प्रकरण नाशिक येथे अपिलात असून न्यायप्रविष्ट बाब झाली आहे.तरीही निवडणूकी बाबत मार्गदर्शन संस्थेच्या वकिलांकडून मागविले आहे असे स्पष्ट केले.
यावर माजी कार्याध्यक्ष प्रविण साहेबराव पाटील म्हणाले की अध्यक्ष यांनी निवडणूकीबाबत 3 पत्र संस्थेला दिले आहे, तरीही कार्याध्यक्ष सचिवांनी अध्यक्ष यांनाच बेकायदेशीर ठरवले आहे.अध्यक्ष बेकायदेशीर असतील तर सर्व बॉडीच बेकायदेशीर आहेत.तीन पत्र दिले असताना अध्यक्षांनी आततायी पणा केला असे कसे म्हणता येईल. निवडणूक घेण्यास आता कोणतीही अडचण किंवा स्टे नसल्याने निवडणूक जाहीर करावी, न्यायप्रविष्ठ बाबींना पुढील बॉडी कोर्टात फेस करेल.खरे पाहता पैसे देऊन मुद्दाम कोर्टात मॅटर पेंडिंग ठेवले आहे असेच आम्हाला वाटत असून निवडणूक यादीही अद्ययावत केली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.व आर्थिक व्यवहार लपविण्यासाठी निवडणूक लांबवित असल्याचा आरोप त्यांनी केला.माजी कार्याध्यक्ष तथा माजी आमदार डॉ बी एस पाटील यांनी स्टे मागच्या निर्णयाला दिला आहे आणि स्टे आहे म्हणून निवडणूक घेऊ नका असे कुठेही नाही, लोक मूर्ख नसून तातडीने निवडणूक जाहीर करावी अन्यथा मोठे जनआंदोलन उभे राहिल असा इशारा त्यांनी दिला.
माजी अध्यक्ष अनिल कदम यांनी आता फाटे न फोडता अध्यक्ष यांनी निवडणूक जाहीर करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.माजी अध्यक्ष विवेकानंद भांडारकर यांनीही निवडणूक जाहीर करण्याबाबत समर्थन दिले.याव्यतिरिक्त राजकुमार छाजेड यांनी मतदार यादीचे काम आपल्या संस्थेला दिल्यानंतरही कराराचा भंग संस्थेने केल्याचा आरोप केला. प्रसाद शर्मा यांनी आपल्या पत्रावर कोणताही खुलासा न केल्याने नाराजी व्यक्त केली,याव्यतिरिक्त सोमचंद संदानशिव, अनंत निकम,दिलीप ठाकूर,लोटन चौधरी, आरिफ भाया,प्रा सुनिल गरुड आदींनी आपआपली भूमिका मांडली.
शेवटी निवडणूक जाहीर करण्याबाबत आग्रह वाढू लागल्याने अध्यक्ष श्री झाबक यांनी चिटणीस प्रा पाटील यांना कार्याध्यक्ष व संचालक मंडळाशी फोन द्वारे चर्चा करून लगेच निर्णय कळवावा असे सांगितल्याने फोनवरील चर्चेअंती संचालक मंडळ 3 दिवसात निर्णय कळविणार असल्याचे प्रा पाटील यांनी सांगितले. त्यानुसार अध्यक्ष यांनी तीन दिवसांची मुदत देत 23 ऑगस्ट रोजी पुन्हा सभासदांसोबत याच कार्यालयात बैठक होईल असे जाहीर केले.
सदर बैठकीस माजी कार्याध्यक्ष मोहन सातपुते,दिलीप जैन,लोटन चौधरी,गोकुळ बिऱ्हाडे,बडगुजर, प्रा दिनेश शेलकर,भरत पवार,प्रा सुनिल गरुड,संदीप जैन, कमल कोचर,वसंत पाटील,रणजित राजपुत, प्रविण जैन,
,जे पी पाटील,प्रणित झाबक,प्रविण देशमुख,प्रा श्याम पवार,राजू फाफोरेकर,संभाजी पाटील,अनंत निकम,चंद्र शेखरभावसार,देवेंद्र देशमुख, खंडू जैन,निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील,माजी अध्यक्ष महेश देशमुख, सुरेश पाटील, संजय पाटील यासह असंख्य सभासद उपस्थित होते.




