
पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाईसाठी मुख्याधिकारीना दिले निवेदन…
अमळनेर:- स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजी नगरपालिकेचे कर्मचारी भाऊसाहेब सावंत यांना सेवानिवृत्त कर्मचारी रघुनाथ मोरे यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा निषेध नोंदवून दोषीवर करवाई करण्याची मागणी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नगरपरिषदेतील कर्मचारी भाऊसाहेब सावंत सकाळी शासकीय कामासाठी सुभाष चौकात गेले असता त्यांना रघुनाथ मोरे यांनी अडवून माहिती का देत नाही , मी युनियन लीडर आहे असे सांगत शिवीगाळ , दमदाटी व मारहाण केली. या भानगडीत माझ्या खिश्यातील ९५० रुपये कुठेतरी हरवले. याबाबत भाऊसाहेब सावंत यांनी पोलिसात तक्रार दिल्यावरून रघुनाथ मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.
याबाबत पालिका कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध व्यक्त करता निवेदन दिले की यापूर्वीही सदर आरोपी नगरपरिषदेच्या विविध विभागांना त्रास देत असून, वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी वारंवार माहिती अधिकारांतर्गत अर्ज करून मनस्ताप देण्याचे प्रकार करीत असतो. १५ ऑगस्ट रोजी अर्जासंबंधी माहिती मिळाली नाही या कारणावरून सावंत कर्तव्यावर असताना सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर उलट आरोपीने खोटे व भ्रामक संदेश समाज माध्यमांद्धारे पसरवून भाऊसाहेब सावंत व त्यांच्या समर्थनार्थ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी सोबत गेलेले नगरपरिषद अधिकारी/ कर्मचारी यांनीच त्याच्यावर हल्ला केल्याचे असत्य प्रचारित केले आहे. या गंभीर घटनेचा नगरपरिषद अमळनेर येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून तीव्र निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणी आपल्या स्तरावरून योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी व आरोपीकडून पसरवल्या जाणाऱ्या असत्य अफवांकडे कोणतीही दखल घेऊ नये, असे आवाहन केले आहे. निवेदनावर उपमुख्यधिकारी आर डी, चव्हाण, डॉ विलास महाजन, कृणाल कोष्टी,सुदर्शन शामदानी, मयूर तोंडे,अजित लांडे, प्रसाद शर्मा, मनोज सोनार, नीलेश संदानशीव, संजय माळी, सतीश बडगुजर, अनिल मराठे,बाळकृष्ण जाधव, गणेश शिंगारे, अविनाश संदानशिव, हरीश पाटील, मिलींद चौधरी, दिनेश पाटील, विजय विसावे, भानुदानस चौधरी, रवींद्र श्रीउदेवाल, मधुसूदन पाटील, कल्पना मराठे, अरुणा बाऱ्हे, पुजा उपासनी, जयेश जोशी, मदन पाटील, रोहिदास राठोड, गणेश बोरोले, विजय महाजन, समाधान बच्छाव, फयाज शे. सोमनाथ वंजारी आदी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
दरम्यान मी कामगारांसाठी लढत आलो आहे. मी मागितलेल्या माहिती अधिकार अर्जाचे उत्तर द्यायचे नाही म्हणून माझ्यावर दडपण टाकण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला आहे. सावंत यांनीच मला शिवीगाळ दमदाटी केल्याचे रघुनाथ मोरे यांनी सांगितले.




