
अमळनेरच्या आरपीएफ अधिकारी कुलभूषणसिंग चौहान यांच्या तत्परतेने संशयिताला अटक
अमळनेर : धावत्या रेल्वेमध्ये तिघांना गुंगीचे औषध देऊन त्यांच्या साहित्याची लूटमार करून पळून जाणाऱ्या पंजाब च्या आरोपीला अमळनेर च्या आरपीएफ अधिकारी कुलभूषणसिंग चौहान यांच्या तत्परतेने अटक करण्यात आली आहे. दरम्यान तिघेही प्रवासी अद्याप बेशुद्धावस्थेत आहेत. ही घटना बुधवारी पहाटे घडली.
अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस मध्ये नवापूर शहराजवळ एक पंजाबी माणूस तिघांना काहीतरी पेय देत असल्याचे एका महिलेने पाहिले. काही वेळात तिघेही बेशुद्ध झाले आणि त्या पंजाबी व्यक्तीने त्यांच्याजवळील साहित्य , बॅगा सोबत घेऊन खिसे चाचपडून पैसे काढून घेतले. मात्र महिला घाबरल्याने तिने कोणालाच सांगितले नाही. नवापूरहुन गाडी हलताच तो पंजाबी सर्व चोरलेले साहित्य घेऊन धावत्या रेल्वेत उतरून गेला. महिलेने ही घटना जितेंद्र पाटील नामक व्यक्तीला सांगीतल्यानन्तर त्याने ताबडतोब अमळनेरच्या आरपीएफ अधिकारी कुलभूषणसिंग चौहान याना कळवले. चौहान सतर्क झाले. आरोपी रस्त्यात उतरला म्हणजे तो परत सुरत कडे जाण्याचा प्रयत्न करेल आणि एकमेव मेमु गाडी आहे म्हणून वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक सत्यजित कुमार, नंदुरबार पोलीस निरीक्षक बसंतराय याना कळवले. त्यांनी तातडीने उदना येथील पोलीस निरीक्षक दौलतसिंग शिसोदिया याना घटना सांगताच त्यांनी उदना स्टेशनवर तगडा बंदोबस्त लावला. भुसावळ हुन सुरत जाणारी मेमु गाडी सकाळी ९ वाजता उदना पोहचताच पोलिसांनी गाडी तपासायला सुरुवात केली. त्यात एकमेव पंजाबी व्यक्ती तीन बॅगा घेऊन जात असल्याचे दिसताच त्याच्यावर झडप घातली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने त्याचे नाव निशांतसिंग रा गुरुदासपूर पंजाब असे सांगितले. आरोपीने रस्त्यात आपले कपडे बदलवून घेतले होते. त्याच्याजवळून सात हजार रुपये , पाच मोबाईल , व गुंगीचे औषध व इतर साहित्य जप्त करण्यात आले. निशांतसिंग हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समजले.
दरम्यान इकडे सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस अमळनेर स्टेशनवर आली असता हेडकॉन्स्टेबल सुनीलकुमार , राकेशकुमार ,राजुराम यांनी तिघा बेशुद्ध व्यक्तींना उतरवून ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉ आशिष पाटील , डॉ जी एम पाटील यांनी प्राथमिक उपचार केले. गुंगीचे नेमके कोणते औषध दिले याची माहिती काढण्यासाठी धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तिघांना रवाना केले. तिघे बेशुद्ध असल्याने त्यांची नावे अद्याप कळालेली नाहीत मात्र त्यांची वये अंदाजे ५५ , २० आणि १६ वर्षे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या भाषेवरून ते कलकत्ता येथील असल्याचे प्रवाश्यांच्या सांगण्यावरून कळले. ५५ वर्षीय व्यक्तीची प्रकृती गंभीर असून तो अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.




