
अमळनेरात शांतता कमिटीची बैठक,मुस्लिम बांधवाना गणेश विसर्जन नंतर ईदची मिरवणूक काढण्याचे आवाहन
अमळनेर-ज्या गणपती बाप्पाना आपण विघ्नहर्ता म्हणतो त्याच विघ्नहर्ताच्या उत्सवात आपण विघ्न कसे घालू शकतो असा प्रश्न स्वतःलाच विचारून शांततेत आनंदात उत्सव साजरा करा तसेच मुस्लिम बांधवानी देखील ईदचा जुलूष तथा मिरवणूक 5 सप्टेंबर ऐवजी गणेश विसर्जन आटोपल्यावर 7 किंवा 9 सप्टेंबर रोजी काढा अशी विनंती वजा आवाहन अमळनेर उपविभागाचे प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
आगामी गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद निमित्ताने शहरातील शांतता समिती सदस्य, गणेश मंडळ पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, मोहल्ला कमिटी सदस्य, महिला दक्षता सदस्य, पोलीस पाटील व पत्रकार बांधव आदींची बैठक प्रांताधिकारी मुंडावरे यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व शासकीय विभागातील विभाग प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काल दिनांक 20 रोजी सकाळी 11 वाजता वाणी मंगल कार्यालय अमळनेर येथे पार पडली.सुरवातीला पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने गणेश मंडळांना काही सूचना करत कायद्याचा धाक बाळगून सण साजरा करावा व मुस्लिम बांधवानी देखील सहकार्य करावे असे आवाहन केले.अध्यक्षीय मनोगतात पुढे बोलताना श्री मुंडावरे म्हणाले की गणेश मंडळांनी वीज वापरण्यासाठी अधिकृतच मीटर घ्यावे,कारण अनधिकृत आकडे टाकल्यावर खूप घटना घडतात व काही घटना घडल्यास मंडळावर कारवाई होईल.मंडळांनी स्थापना करताना फक्त 25 टक्केच रस्ता व्यापला पाहिजे,पण तसे चित्र नाही,यामुळे प्रशासनास सुविधा पुरवता येत नाहीत,दरवर्षी मी स्वतः गणेश विसर्जन घरी ड्रम मध्ये करतो, तुम्हीही तसे करा यामुळे घाटावर गर्दी होणार नाही,ध्वनी प्रदूशन नकोच असून मर्यादा व नियम पाळलेच पाहिजे.सण आनंदी व मंगलमय वातावरणात साजरा झाला पाहिजे.शासनाने मंडळासाठी स्पर्धा जाहीर केल्या आहेत,नियम पाळणाऱ्या चांगल्या मंडळांनी यात सहभागी व्हावे.गणेश मूर्ती आपण गावाची परिस्थिती लक्षात न घेता मोठी आणतो आणि आपल्याकडून पेलवले न गेल्यास अपेक्षा मात्र प्रशासनाकडून करतो.हे थांबले पाहिजे,कायद्याचे पालन सर्वानी करावे,आपल्या टवाळ कार्यकर्त्यांना आवर घालावा, सोशल मीडियावर अफवा पसरवू नका असे आवाहन त्यांनी केले.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी गणेशोत्सवात नादुरुस्त रस्ते दुरुस्त करण्यात येतील,रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून ते गोशाळेत जमा करू, गणेश मंडळांनी मूर्ती व प्रसाद ची विटंबना होणार नाही याची काळजी घ्यावी,पत्रकार संघाचा यंदा एकच स्वागत कक्ष हा चांगला निर्णय आहे.मंडळांनी स्थापना करताना वाहतुकीस अडथळा निर्माण होणार याची काळजी घ्यावी तसेच मंडळांना ना हरकत देणे सुरू केले आहे,पदाधिकारीनी पालिकेत येऊन घेऊन जावे,तसेच वीज विद्युत पोल वरून न घेता महावितरण कडून घ्यावी,मंडळांनी मुलांसाठी चांगल्या स्पर्धा घ्यावात असे सांगत निर्माल्य संकलन करण्यासाठी विविध मार्ग अवलंबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दगडी दरवाजा जवळ मिरवणुकीच्या स्वागतासाठी सर्व मिळून एकच स्वागत मंच उभारणार असल्याचे सांगितल्याने सर्वानी याचे स्वागत केले.भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे यांनी हा सण ऐक्याचे प्रतीक असल्याने सर्वमिळून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडून केले.माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी गणेशोत्सव व ईद दोन्ही सण आपले असल्याने शांततेतच होतील अशी ग्वाही दिली. सौ सुलोचना वाघ यांनी राजकीय देखावे टाळावे,दक्षता समितीच्या महिलांना बॅचेस द्यावे,अनंत निकम यांनी पारंपरिक सण आनंदात साजरा करावा व दामिनी पथक नियुक्त करण्याची मागणी केली.सौ माधुरी पाटील यांनी गणेशोत्सव काळात महिलांना जवाबदारी द्यावी व वेगात वाहने चलविणाऱ्यांना आवर घालावा,ऍड शकील काझी यांनी शांततेस गालबोट लावू नये,प्रा अशोक पवार यांनी सण साजरा करताना आपण भारतीय आहोत याचे भान ठेवावे, प्रविण पाठक यांनी रस्ते चांगले करावे, वीजपुरवठा सुरळीत करावा व निर्माल्य पालिकेने घंटागाडी तुन संकलित करावे आदी सूचना केल्या.मनोहर महाजन यानी प्रत्येक मंडळाने शांतता भंग होऊ नये यासाठी आपल्याच मुलांचे समुपदेशन करावे आणि मुस्लिम बांधवानी मिरवणुकीच्या स्वागताची परंपरा सूरु करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.पोलीस पाटील गणेश भामरे यांनी सोशल मीडियावर निर्बंध घालण्याची अपेक्षा व्यक्त केली.हेमंत भांडारकर यांनी निर्माल्य कलश उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.याव्यतिरिक्त रणजित शिंदे, उमेश धनराळे, सुनिल महाजन,नितीन भदाणे,दत्ता ठाकरे,राजू चौधरी, प्रा दिनेश शेलकर,सुनिल शिंपी,चंद्रकांत कंखरे,जयंत वानखेडे आदींनी विविध सुचना मांडल्या.
यावेळी मंचावर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, महावितरणचे उपविभागीय अभियंता तुषार नेमाडे,अभियंता नितीन चौधरी,मारवड पो स्टे चे एपीआय जीभाऊ पाटील, पीएसआय समाधान गायकवाड, शरद काकविज, युवराज बागुल यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच गणेश मंडळ आणि राजकिय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन संजय पाटील तर आभार गोपनीय शाखेचे सिद्धांत शिसोदे यांनी मानले.




