
ग्रामपंचायत अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने गटविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांची मागणी…
अमळनेर : तालुक्यातील नांद्री येथील रहिवासी क्षेत्रातील दूषित ,शेवाळयुक्त पाण्याचे डबके साफ करण्यात यावे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करावे अशी मागणी डिगंबर चौधरी व राहुल पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

नांद्री गावात दोन ते अडीच हजार चौरस फूट क्षेत्राचा साधारणतः २० फूट खोल खड्डा रहिवासी क्षेत्रात असून या खड्डयात पुरामुळे पाणी साचले आहे. या खड्यात विषारी साप , विंचू , विषारी कीटक , डास असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डिगंबर चौधरी , दाजभाऊ भिल , मोतीलाल चौधरी , संतोष पाटील , मच्छीन्द्र चौधरी , सरुबाई भिल , सुनील चौधरी , राजेंद्र पाटील , गजू भिल आदी परिवाराच्या आरोग्यला धोका निर्माण झाला आहे. नांद्री गावच्या १५ ऑगस्ट ची प्रलंबित ग्रामसभा २० ऑगस्ट रोजी झाली तेव्हा ग्रामसेवकाला याबाबत सांगितले असता त्याने उद्धट उत्तरे दिली आणि तुम्हाला जेथे जायचे तिथे जा आम्ही काहीच करू शकत नाही असे सांगण्यात आले. तरी तातडीने हा खड्डा साफ करून कायमस्वरूपी बुजण्यात यावा अशी मागणी करून अन्यथा आम्ही ग्रामपंचायतीवर बहिष्कार टाकू असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी याना देण्यात आले आहे. दरम्यान सरपंचने देखील याबाबत ग्राम विकास अधिकारी यांना पत्राद्वारे हा खड्डा बुजवण्याची मागणी केली आहे.




