
जाब विचारल्यावर जातीवाचक उल्लेख करीत जीवे मारण्याची दिली धमकी
अमळनेर:- पोटा पाण्यासाठी सुरत येथे गेलेल्या सात्री येथील कुटुंबाच्या शेतातून कलाली येथील पोलिस पाटलाच्या मदतीने दोघांनी बळजबरीने खासगी रस्त्यासाठी बेकायदेशीरपने हजारो ब्रास मुरून खोदून चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेतमालक वृद्धाने याचा जाब विचारल्यावर उलट पोलीस पाटलाने जातीवाचक उल्लेख करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा चोर तर चोर वरून शिरजोर असल्याचा प्रकार असल्याने त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वृद्धाने प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे.
सात्री येथील वृद्ध अशोक विठ्ठल बाविस्कर (वय 60) यांनी प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सात्री येथे कायमस्वरुपी राहिवाशी असून कलाली (ता.अमळनेर) येथे शेतगट क्रमांक 167/1, 167/2, 167/3 असे शेत मिळकत आहे. मात्र बऱ्याच वर्षापासून सहपरिवार येवून जावून सदरच्या शेतात मशागत करुन पिकपेरा लावून उत्पन्न घेत असतो. त्यावरती पारिवारीक उदरनिर्वाह भागत असतो. शेती शिवाय दुसरा पर्यायी व्यवसाय नाही. अशात आम्ही काही महिन्यापासून गावात हाताशीकाम मिळत नसल्याकारणाने सुरत येथे पोटा पाण्यासाठी गेलो होतो. याचा गैरफायदा घेवून विनोद पाटील (पूर्ण नाव माहित नाही), दिपक पांडूरंग पाटील यांनी
आमच्या शेती बद्दल तसेच मालकी हक्काबद्दल माहिती असताना देखील जाणून बुजून हेतुपुरस्कर आमची कुठलेही परवानगी न घेता परस्पर कलाली येथील पोलीस पाटीलांना हाताशी धरुन शेतातील अंदाजे हजारो ब्रास मुरुम परस्पर ट्रॅक्टर व जे.सी.बी.च्या साहयाने चोरुन नेलेला आहे. याबाब आम्हास माहित झाल्याबरोबर दिनांक 23 जून 2025 रोजी संबंधीत तिघांना विचारणा केली. तसेच पोलीस पाटील (कलाली) यांना विचारणा केली असता त्यांनी स्पष्ट स्वरुपात सांगितले की, आम्हास विचारण्याची गरज नाही. आम्हास गरज होती म्हणून आम्ही मुरुम घेतलेला आहे. आम्ही तो रस्त्याच्या कामासाठी वापरलेला आहे. यापुढेही आम्ही तुमच्या शेतामधूनच मुरुम काढणार आहोत. तुमच्याने जे होईल ते बिनधास्तपणे करुन घ्या, असेही तुमचा महार जातीच्यालोकांना शेती करण्याचा अधिकार नाही. तुमच्याने शेतीही करणे होणार नाही. उगीचच तुमचे लोक आमच्या हेवा करुन शेती घेतात. याउलट अजून धमकाविले आहे की, जेव्हा, जेव्हा आम्हाला मुरुमची व मातीची आवश्यकता लागेल त्या त्या वेळेस आम्ही तुमच्या शेतातूनच काढू. या व्यतिरिक्त तुम्ही जर आमच्या विरोधात कुठेही तक्रार केली तर आम्ही तुम्हाला जिवंत राहू देणार नाहीत, असेही सरकार आमचे बसलेले आहे. तुमच्याकडून आमचे काहीएक वाकडे होणार नाही व तुमच्या जातीची तेवढ़ी लायकीही नाही, असे धमकावले आहे. तिघांनीही जातीचा तिरस्कार करुन आमच्या शेतातून आमचे कुठलीहीपूर्व परवानगी न घेता मुरूम व माती परस्पर चोरुन नेवून त्यांचा खाजगी रस्त्यासाठी वापरकेलेला आहे. आज रोजीही करीत आहेत. असे असताना देखील ते सतत जातीवाचक शब्दवापरून जिवेठार मारण्याची धमकी देत आहेत. या विषयाचे गांर्भीय बघून तिघांवर तात्काळ फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. निवेदनाची प्रत तहासिलदार, उपविभागीय पोलिस अधीक्षक, मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना पाठवण्यात आली आहे.




