
अमळनेर:- गणपती बाप्पांचे आगमन व गणेशोत्सवासाठी २७ रोजी शहरातील पाच पावली मंदिर परिसर गजबजून गेला होता.सकाळी ८ वाजल्यापासूनच गणपती मूर्ती,पूजेचे साहित्य, घरगुती व मंडळाच्या आकर्षक रोषणाईसाठी लागणारे सजावट साहित्य घेण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती.यावेळी नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.गर्दीमुळे अवजड वाहनांना मुख्य रस्त्यावरून प्रवेश बंद करण्यात आला होता.
शहरातील पाच पावली मंदिर परिसरात लहान व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या बाजूलाच दुकाने थाटलेली होती.यात गणपतीसाठी आकर्षक विद्युत रोषणाई केलेली रेडीमेड सजावट सोबतच दुर्वा,नारळ,रांगोळी,पूजा साहित्य,रंगीत आसन,जानवे यासोबतच गणपती स्थापनेसाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंची विक्री व्यापाऱ्यांकडून केली जात होती.रंगीबेरंगी कृत्रिम हार मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध होते.यावेळी केळी,सफरचंद,पेरू,चिकू, यासह पूजेसाठी लागणाऱ्या फुले व फळांची देखील खरेदी नागरिकांकडून मोठ्याप्रमाणात करण्यात आली.
आकर्षक व सुबक मूर्त्यांची मागणी.
मागील वर्षापेक्षा गणपती च्या मूर्तींचे भाव २० ते २५ टक्क्यांनी वाढलेले होते.घरगुती गणेशोत्सवासाठी नागरिकांनी लहान,आकर्षक व सुबक मूर्त्यांची मागणी केलेली दिसून आली.
पोलिसांचा परिसरात चोख बंदोबस्त
सकाळपासूनच बाजारपेठेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्ग देण्यात आलेले होते.यावेळी बाजारपेठ परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.




