
शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, नागरिकांची मागणी…
अमळनेर:- शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून झुंडीने हल्ला केल्याने लहान मुले जखमी झाल्याच्या बऱ्याच घटना गेल्या दोन दिवसात घडल्या आहेत. याबाबत कारवाई करावी म्हणून नागरिक निवेदन देत असताना काही प्राणीप्रेमींच्या विरोधामुळे निर्बीजीकरणाचे काम थांबल्याचा खुलासा नगरपरिषदेकडून करण्यात आला आहे.
शहरात मोकाट जनावरे सर्रासपणे रस्त्यावर वावरताना दिसतात.यामुळे अपघातासह वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.भटक्या कुत्र्यांनी कॉलनी परिसरात अक्षरशः उच्छाद मांडला आहे. कुत्रे झुंडीने हल्ला करत असल्याने शहरातील लहान मुलांसह वृध्द नागरिकांच्या मनात भय निर्माण झाले आहे. नगरपरिषद प्रशासन भटक्या कुत्र्यांसह ईतर जनावरांना आवर घालण्यासाठी नसबंदी करण्यासाठी टेंडर राबवून काम ही सुरू केले होते. मात्र शहरातील प्राणीमित्र संघटनेच्या विरोध होत असल्याचा खुलासा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्याकडून करण्यात आला आहे. काही प्राणीमित्र संघटनेच्या माध्यमातून अशी कारवाई करू नये म्हणून नगरपरिषद प्रशासनावर उच्च स्तरावरून दबाव आणला जात असल्याची माहिती आहे. अश्या या प्राणीप्रेमी संघटनेने नागरिकांच्या जिविताचे रक्षण करावे व या मोकाट जनावराचा बंदोबस्त करावा म्हणून मागणी जोर धरू लागली आहे.




