
अमळनेर : बंद पडलेल्या लिफ्टला पर्यायी व्यवस्था न केल्याने एकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना १९ जुलैला सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली. उशिरा फिर्याद दिल्यावरून ठेकेदार आणि अभियंत्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा रस्त्यावरील गजानन महाराज मंदिराजवळ ठाकुरदास चांदवाणी यांच्या वाणिज्य इमारतीचे बांधकाम सुरू असून त्याठिकाणी विनायक रतीराम नाईके रा. सुदामापुरी सिंहाळा खंडवा मध्यप्रदेश हा सेन्ट्रिंग काम करत होता. त्या ठिकाणची कामावरची पुली बंद पडली होती. त्यामुळे त्याच्या मित्र राजाबाबूने त्याला पाचव्या मजल्यावरून लोखंडी सळईला दोरी बांधून ओढायला सांगितली. तो सळई ओढत असताना अचानक लिफ्ट सुरू झाली आणि लोखंडी सळई लिफ्टच्या विद्युत प्रवाहाला स्पर्ध झाल्याने विनायक याला शॉक लागला. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी विनायकला मृत घोषित केले. ठेकेदार सुभाष त्रिभुवन आणि अभियंता निखिल नागदेव यांनी लिफ्ट बंद झाल्यानन्तर पर्यायी व्यवस्था केली पाहिजे होती आणि खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही, निष्काळजीपणाने त्याचा मृत्यू झाला.
विनायकचे वडील नानु याने २८ ऑगस्ट रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला ठेकेदार आणि अभियंत्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) प्रमाणे मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.




