
अमळनेर : तालुक्यातील मारवड मंडळात २९ रोजी १२० मिमी पाऊस झाल्याने वासरे येथील वस्तीत पाणी शिरल्याने सुमारे ८० घरातील अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाल्याने ते कुटुंब उघड्यावर आले आहेत. मारवड येथे ही एका घराचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
अमळनेर तालुक्यात अति वृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी वस्त्यांमध्ये पाणी , गावांचा संपर्क तुटला , शेतांचे अतोनात नुकसान झाले. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी तातडीने ग्राम महसूल अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना आपद्ग्रस्तांच्या मदतीला पाठवले. वासरे येथिल जिल्हा परिषद शाळेच्या मागील गल्लीतील लोकांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढून त्यांना समाज मंदिरात तसेच गावातील उंच ठिकाणी असलेल्या घरांमध्ये राहण्याची सोय करण्यात आली. सुमारे ८० कुटुंब उघड्यावर आली आहेत. काहींची घरे पडली तर सर्वांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू अन्न धान्याची नासाडी झाली. इतर गावकरी मदतीला धावले आणि त्यांच्यातर्फे उघड्यावर पडलेल्या कुटुंबाच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीने त्यांना शिधा वाटप केले. तर कळमसरे ,निम , शहापूर येथील अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांना ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात हलवण्यात आले आहे. तसेच टाकरखेडा येथे ढग फुटी सदृश्य पावसामुळे हजारो हेक्टर मका , कपाशी आणि उडीद ,मूग पिकांचे नुकसान झाले आहे. पिके शेतात आडवी पडली आहेत.
घटनास्थळी खासदार स्मिता वाघ , माजी जिप सदस्य जयश्री पाटील, भैरवी पलांडे , डॉ अनिल शिंदे यांच्यासह प्रशांत धमके यांनी वासरे व इतर गावांना भेटी देऊन आपद्ग्रस्तांचे सांत्वन केले. खासदार वाघ आणि आमदार अनिल पाटील यांनी प्रशासनला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. अद्याप शेती पिकांचा नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्राप्त झाले नसल्याचं तलाठी कडून बोलले जात आहे.
कळमसरे येथे ही नुकसान…
कळमसरे येथील स्वस्त धान्य दुकानात पुराचे पाणी शिरल्यामुळे सुमारे 30 क्विंटल धान्याची नासाडी झाली असून,याचा पंचनामा करण्यात आला आहे.कळमसरेत 15 घरांचे नुकसान झाले. 30 घरात पावसाचे पूराचे पाणी घरात शिरल्याने संसार उपयोगी वस्तूंचे व अन्न धान्याचे नुकसान झालेले आहे असे कळमसरे तलाठी यांनी पंचनामा करुन माहीती दिली. यावेळी तलाठी भूषण पवार ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, कृषी सहाय्यक अजय पवार, कोतवाल आधार सोनवणे, पोलिस पाटील गोपाल माळी यांनी पंचनामा केला.
वासरे येथे प्रशासनासह अनेकांची मदत…

वासरे येथे पावसाचे पाणी शिरले होते. त्या ठिकाणी प्रशासनाने पाहणी केली असता एकूण 82 कुटुंब बाधित झाले असून सदर कुटुंबांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली तसेच ग्रामपंचायत वासरे मार्फत त्यांना शिधा वाटप करण्यात आले. मुकेश देसले ग्राम महसूल अधिकारी वासरे अशोक पाटील ग्रामपंचायत अधिकारी वासरे गणेश पाटील कृषी सहाय्यक वासरे यांनी नुकसानीचा संयुक्त पंचनामा केला आहे. लायन्स क्लब कडून वासरे येथे काल रात्रीचे जेवण देण्यात आल्याचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सांगितले.
बाजार समिती सभापतींकडुन तातडीची मदत…

दि. 29 ऑगस्ट रोजी अमळनेर तालुक्यातील वासरे या गावपरीसरात अतिवृष्टी व ढगफुटी मुळे घरांचे व तसेच पिकांचे नुकसान झाले आहे. सदर स्थितीची पहाणी करून आणि स्थानिक नागरीकांशी सांत्वनपर संवाद साधून अमळनेर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी तातडीची मदत म्हणून वासरे येथे तांदूळ, खाद्यतेल, डाळ अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून नागरिकांना दिलासा दिला.




