
सरसकट पंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी…
अमळनेर :- तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे गावांमध्ये आणि शेतीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी ता. ३१ ऑगस्ट रोजी तालुक्यातील वासरे,कळमसरे गावांना भेट दिली. त्यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
पाहणी केल्यानंतर मीनल करणवाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पूरग्रस्त घरे आणि शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, पुढील दोन दिवस अजून पावसाचे वातावरण असल्याने, पाऊस थांबल्यानंतर शेतीचे देखील पंचनामे होतील. त्यामुळे शेतकरी बांधवांनी अजिबात चिंता करण्याची गरज नाही. शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. या पाहणी दौऱ्याच्या वेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील वासरे येथील ग्रामसेवक अशोक पाटील, महसूल अधिकारी मुकेश देसले, कळमसरे येथील ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील, गणेश पाटील यांच्यासह दोन्ही गावातील सरपंच, उपसरपंच इतर शासकीय कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
सरसकट पंचनाम्याची मागणी…
ता. 29 रोजी झालेल्या मारवड मंडळात 120 मि. मी. पावसाची नोंद असताना अजूनही सरसकट पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. शासनाने पंचनामा करण्यात येतील असे सांगितले जात असले तरी मारवड मंडळात सरसकट पंचनामे होणार नाहीत असे सांगण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना सध्यस्थीतीत लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांनी दिलासा दिला असला तरी शेतकऱ्यांना अजून कोणती परीक्षा द्यावी लागेल असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान वासरे येथे ता. ३० रोजी बाजार समितीचे सभापती अशोक पाटील तर ता. ३१ रोजी पंचायत समितीचे माजी उपसभापती भिकेश पाटील यांनी संसार उपयोगी किट वाटप केले तर अमळनेर तालुका महाराष्ट्र पत्रकार संघाने वासरे येथील आपदग्रस्त यांना काल दुपारचे जेवण दिले.




