
सर्व संस्थांच्या सहयोगाने रक्तदानाचे महाअभियान यशस्वी,215 जणांनी केले स्वयंस्फूर्तीने रक्तदान
अमळनेर-येथे दिनांक 17 सप्टेंबर रोजी मेगा ब्लड डोनेशन ड्राइव्ह तथा रक्तदानाचे महाअभियानाचे आयोजन तेरापंथ युवक परिषद व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने करण्यात आले होते.सदर अभियानास प्रचंड प्रतिसाद लाभून तब्बल 215 जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.

रक्तदान अमृत महोत्सव 2.0 निमित्ताने युगप्रधान आचार्य श्री महाश्रमण जी व पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेने संपूर्ण भारतभर हे अभियान राबविले गेले असून अमळनेर येथे रोटरी हॉल येथे सकाळी 9 वाजेपासून हे अभियान सुरू झाले.सुरवातीला अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या हस्ते या अभियानाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले.त्यांनी मिळालेला प्रतिसाद पाहून रक्तदात्यांचे कौतुक केले. तेरापंथ युवक परिषद अमळनेर, ओसवाल जैन संघ,अमळनेर, जैन सोशल ग्रुप अमळनेर,रोटरी क्लब,अमळनेर,भारतीय जैन संघटना, न्यू प्लॉट परिसर विकास मंच,अमळनेर लायन्स क्लब,अमळनेर नगरपरिषद,जळगाव जनता सहकारी बँक,अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना,रोटरेक्ट क्लब,अमळनेर आदींच्या सहयोगाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.सर्व स्तरातील नागरिकांनी सकाळपासूनच रक्तदान करण्यासाठी गर्दी केली होती.यात डॉक्टर,व्यापारी,शेतकरी, नोकरदार व कष्टकरी मंडळींसह युवकांचा समावेश होता.विशेष म्हणजे काही महिलांनी देखील स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.तर रक्तदाते म्हणून ओळख असलेले गणेश शिंगारे यांनी 112 वे रक्तदान केले.सर्व संस्थांच्या प्रतिनिधींचे अनमोल सहकार्य यासाठी लाभले.
तर रक्त संकलन अमळनेर येथील जीवनश्री रक्तपेढी चे संतोष पाटील व त्यांच्या स्टाफ ने केले.सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे अभियान सुरू होते.सर्व रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.




