
खरीप हंगाम वाया गेल्यानंतर गुरेही चोरी झाल्याने बळीराजा हवालदिल…
अमळनेर : तालुक्यातील ढेकू बुद्रुक गावासह शहापूर परिसरात काल मध्यरात्री घडलेल्या पशुधन चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास एक ते तीनदरम्यान अज्ञात चोरट्यांनी गावात प्रवेश करून शेतकऱ्यांचे मौल्यवान जनावर चोरून नेल्याची माहिती मिळाली आहे.

ढेकू बुद्रुक येथील प्रवीण दिलीप पाटील यांची बैलजोडी तसेच अनिल प्रकाश पाटील यांची म्हैस चोरट्यांनी लंपास केली. तसेच शहापूर येथील दिनेश लोटन पाटील यांच्या दोन गायी व वासरू, अरुण प्रकाश पाटील यांचा एक बैल व एक गोऱ्हा, शांताराम धनराज पाटील यांची एक गाय व एक वासरू, अरुण दामू पाटील यांच्या दोन गायी व एक वासरू अशी एकूण तेरा गुरे एका रात्रीतून चोरी करण्यात आली आहेत. आधीच आस्मानी संकटाने खरीप हंगाम वाया गेला असताना गुरांवर ही चोरांची वक्रदृष्टी झाल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. चोरीच्या सलग घटनांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामीण भागात पशुधन हे शेतकऱ्यांसाठी कुटुंबाचा आधार असते. त्यातून दुध, शेती काम व आर्थिक उत्पन्न मिळते. परंतु जनावरे चोरीस गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर ढेकू बुद्रुक व शहापूर परिसरात नागरिकांनी आपली जनावरे सुरक्षित ठेवण्याची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. अमळनेर व मारवड पोलिसांनी चोरी गेलेल्या जनावरांचा शोध घेऊन चोरट्यांना तात्काळ गजाआड करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.




