
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असल्याने दररोज दर्शनासाठी भाविकांची होतेय मोठी गर्दी
अमळनेर-येथील न्यू प्लॉट भागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील न्यू प्लॉट परिसर विकास मंच नवरात्र महोत्सवात अमळनेर तालुक्यातील ग्रामदैवत असलेल्या इच्छापूर्ती सती माता मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून लाखो भाविकांचे हे श्रध्दास्थान असल्याने दररोज दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

सदर प्रतिकृती शहरातील चेतन उपासनी यांनी साकारली असून रेल्वे रूळ दाखविण्यासह हुबेहूब तसेच चित्र निर्माण केले असल्याने आपण चांदणी कृर्हे येथील सती माता मंदिरावरच आलो आहोत अशी भावना भाविकांच्या मनात निर्माण होत आहे.यासाठी मंडळाचे कार्यकर्ते तथा सती माता भक्त महेंद्र पाटील व महेश राजपूत यांचे सहकार्य लाभले आहे. कोणत्याही समस्येबाबत मानता माना …पूर्ण होणारच अशी आख्यायिका असलेले अमळनेर तालुक्यातील चांदणी कुर्हे येथील सती माता मंदिर अनेक वर्षांपासून दोन रेल्वे रुळांच्या दरम्यान स्थिरावले आहे. वर्षभर या ठिकाणी नवस फेडायला गर्दी झालेली असते. श्रावण महिन्यात विशेष भंडारा आयोजित केला जातो.याच मंदिराची प्रतिकृती न्यू प्लॉट परिसर विकास मंच नवरात्र महोत्सवात मोठ्या श्रद्धेने साकारली आहे.
अशी आहे आख्यायिका–
सुरत भुसावळ रेल्वे लाईन अस्तित्वात नसताना धरणगाव अमळनेर कच्चा रस्ता होता. १५० वर्षांपूर्वी कुर्हे खुर्द गावातील एक महिला सासुरवाशीण होती. सासरवाडीच्या जाचाला कंटाळून ती मोठ्या निंबाच्या झाडाखाली येऊन बसली. रात्र तिने तिथे बसून काढली. ती तेथेच लुप्त झाल्याची आख्यायिका असून त्याठिकाणी तिने समाधी घेतल्याची पूर्वजांची नोंद आहे. ती सती गेली म्हणून तिचे मंदिर बांधण्यात आल्याचे समजते. याठिकाणी उंच दगडाच्या ओट्यावर हे मंदिर आहे. दिवसेगणिक सती माता मंदिराचे महत्व खूपच वाढले असुन मुलबाळ होत नसलेले , राजकीय इच्छा पूर्ण होण्यासाठी , कठीण प्रसंग आल्यावर लोक नवस मानायला याठिकाणी येतात. सती मातेच्या प्रतिमा सर्वप्रथम याच मंडळाचे महेंद्र पाटील व महेश उर्फ बाळा राजपुत यांनी साकारल्या असून त्याची विक्री होऊ नये म्हणून हजारो भाविकांच्या घरात मातेच्या या प्रतिमा मोठया श्रद्धेने विनामूल्य पोहोचल्या आहेत.तसेच या देवीची आरती देखील नुकतीच महेंद्र पाटील यांनी तयार केली आहे. वर्षभर लोक पूजेसाठी येथे गर्दी करतात. दोन्ही रूळ ओलांडून लोक ये जा करतात मात्र आजपर्यंत एकही अपघात झालेला नाही हे विशेष आहे.
देखावा पाहण्यासाठी होतेय गर्दी,,
न्यू प्लॉट परिसर विकास मंच नवरात्र महोत्सवात सदर सती माता देखावा पाहण्यासह दररोज रात्री निसर्गरम्य वातावरणात दांडिया रास साठी देखील महिला भाविकांसह बाल गोपालांची मोठी गर्दी होत असून दसऱ्यापर्यंत विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
अष्टमीला होणार महाआरती
अष्टमीला 30 सप्टेंबर रोजी रात्री माता सती माता व माता सप्तश्रृंगी यांची 151 यजमानांची सहपत्नीक भव्य महाआरती होणार असून या आरतीचे मुख्य यजमान माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील व माजी नगराध्यक्ष सौ जयश्री पाटील असणार आहेत.त्यांच्या सोबत खासदार स्मिताताई वाघ व अमळनेर न प चे मुख्याधिकारी तुषार नेरकर,यासह इतर अधिकारी वर्गाची उपस्थिती लाभणार आहे.
तरी सर्व भाविकांनी सती माता दर्शनासाठी जरूर यावे असे विनम्र आवाहन न्यू प्लॉट विकास मंचचे अध्यक्ष चेतन राजपुत, नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष किशोर बितराई, कार्याध्यक्ष महेंद्र पाटील व सर्व सदस्यांनी केले आहे.




