
वाळूचा भस्मासुर प्रशासनावरच उलटणार, अमळनेरच्या अधिकाऱ्यांकडून शासननिर्णयाची पायमल्ली…
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ येथे वाळूचे ट्रॅक्टर पकडणाऱ्या तीन तलाठ्यांना वाळू माफियांनी शिवीगाळ व दमदाटी करून ट्रॅक्टर पळवून नेल्याने आता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून पोसलेला भस्मासूर हळूहळू प्रशासनावरच उलटण्याची चिन्हे आहेत.

२५ रोजी तोंडी आदेशाने वाळूचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेले तलाठी महेंद्र माळी, विकेश भोई, विक्रम कदम हे मांडळ रस्त्यावर गेले असता संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास समोरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर त्यांनी थांबवले. सदर ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू वाहून नेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तलाठी कदम हे तहसील कार्यालयात ट्रॅक्टर नेण्यासाठी ड्रायव्हर सीटवर बसले असता गोपाळ बाळू पाटील (रा. सातरणे) व अजय ईश्वर कोळी (रा. मांडळ) हे त्याठिकाणी आले व तलाठी कदम यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून खाली उतरवले. तसेच तलाठी विकेश भोई व माळी यांना देखील शिवीगाळ व दमदाटी केली व गोपाल याने ट्रॅक्टर मधली वाळू उपसून ट्रॅक्टर अमळनेरच्या दिशेने पळवून नेले. तलाठी महेंद्र माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय युवराज बागुल हे करीत आहेत.
ह्या प्रकारामुळे अधिकाऱ्याच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे वाढलेला भस्मासुर आता प्रशासनातील कर्मचाऱ्यांवरच उलटतांना दिसत असल्याचे चित्र समोर आले आहे.
अधिकाऱ्याकडून शासन निर्णयाची पायमल्ली…
वाळू व इतर गौण खनिजांचे उत्खनन, वापर व वाहतूक प्रकरणी विविध कायद्यान्वये फौजदारी कारवाई करण्याबाबत शासननिर्णय १७ जुलै रोजी राज्यशासनाने निर्गमित केला असताना ही पकडलेली गौण खनिजाची वाहने फौजदारी कारवाई न करता फक्त शास्ती लावून सोडून देण्याचा प्रकार अमळनेर महसूल विभागात घडला आहे. अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्याला फौजदारी कारवाईपासून वाचवण्यामागे तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांचे काही हित लपले आहे का ? अशी शंका आता उपस्थित होत आहे. वाळू व गौण खनिज माफियांना वाचवणाऱ्या या अधिकाऱ्यांबाबत आता याबाबत आता जिल्हा व विभागीय स्तरावर पुराव्यासहित तक्रारी करण्यात येणार आहेत.




