
उद्या दसऱ्याला श्री अंबरीश महाराज टेकडीवर होणार समारोप
अमळनेर-येथील जय बजरंग मित्र मंडळ, पानखिडकी आणि श्री शिवप्रतिष्ठान अमळनेर यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्ताने शहरात दररोज पहाटे भक्तिभावाने दुर्गादौड निघत असल्याने सर्वत्र भक्तिभावाचे वातावरण निर्माण होत आहे.

उद्या दिनांक 2 ऑक्टोबर रोजी पहाटे दसऱ्याला श्री गायत्री माता मंदिरास भेट दिल्यानंतर श्री अंबरीश महाराज टेकडीवर समारोप होणार आहे.घटस्थापनेपासून दररोज पहाटे 5 वाजता जुनी चावडी,पान खिडकी येथील आई इच्छापूर्ती दुर्गा माता मंदिर येथे आरती होऊन दुर्गा माता दौड ला प्रारंभ होत असतो. यात असंख्य महिला व पुरुष भाविक तसेच तरुण भक्तिभावाने सहभागी होत असतात,विशेष म्हणचे अतिशय शिस्तीत चालत ही पदयात्रा काढली जात असते.यात सर्वानी पांढरा पोशाख व डोक्यावर केशरी किंवा पांढरी टोपी परिधान केलेली असते.भजन व भावगीत सादर करीत ही पदयात्रा शहरातील विविध मंदिरांना भेट देत असते. आतापर्यंत गेल्या आठ दिवसात श्री हिंगलाज माता,श्री कालिका माता मंदिर,मंगलादेवी माता मंदिर, वसईदेवी माता मंदिर व संतोषी माता मंदिर,शिवशक्ती चौक,पटवारी कॉलनीतील श्री रामेश्वर माता भवानी मंदिर,श्रीराम कॉलनीतील दुर्गा माता मंदिर,पाच पावली माता मंदिर,भवानी माता मंदिर पैलाड,जुना पारधी वाड्यातील जय मातादी मंदिर,तांबेपुरा तील श्री सप्तश्रृंगी माता मंदिर व श्री गणेश दुर्गा माता मंदिर आदींना भेटी दिल्या आहेत. आज 1 रोजी मिलचाळ मधील सप्तश्रृंगी माता मंदिर व श्री स्वामी नारायण मंदिर व उद्या 2 रोजी श्री अंबरीश महाराज टेकडीवर समारोप होणार आहे.
दरम्यान संपुर्ण महाराष्ट्रात व देशात दरवर्षी आई जगदंबेच्या नवरात्रोत्सवात ९ दिवस म्हणजे दसऱ्यापर्यंत भावपूर्ण, श्रध्दापूर्ण पहाटे पायी दुर्गामाता दौड पू. संभाजी भिडे (गुरुजी) श्री शिवप्रतिष्ठान (हिंदुस्थान) संस्थापक यांच्या प्रेरणेने व नेतृत्वाखाली सुरु आहे.
नवरात्र हे राष्ट्रीय नवरात्र म्हणून शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान साजरे करते! पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज आज कुठेही जिवंत दिसत नाहीत… ते पुन्हा जन्म घ्यावेत आणि अधोगतीला जाणारा हा हिंदु समाज टिकवावा यासाठी आई भगवतीला भल्या पहाटे विनवनी करणारा हा उपक्रम म्हणजे श्री दुर्गामाता दौड असल्याचे आयोजकांनी सांगितले.




