
प्रशासन व वाहतूक नियंत्रण विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिक झाले त्रस्त…
अमळनेर :- शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच हॉस्पिटल, बँका आणि खासगी क्लासेसच्या परिसरात वाहनांची अवैध व अनियमित पार्किंग नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनली आहे. या बेकायदेशीर पार्किंगमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असून, याकडे प्रशासनाचे आणि वाहतूक विभागाचे लक्ष जात नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

अनेक हॉस्पिटल्सजवळ रुग्णवाहिका अडकतात, वेळेवर उपचार मिळत नाहीत. बँकांसमोर वर्दळीच्या वेळेत गाड्यांचा नुसता रस्ता अडवलेला असतो. क्लासेसजवळ पालक व विद्यार्थ्यांची गर्दी असते, आणि त्यातच अडथळा निर्माण करणाऱ्या बेशिस्त गाड्या – ही परिस्थिती सामान्य झाली आहे.
शहरातील सुभाष चौक परिसर,बाजार पेठ,एस.टी. स्टँड परिसर, बँक परिसर,खाजगी क्लासेस,कॉलेज रोड,धुळे रोडवरील बँक ही शहरातील प्रमुख ठिकाणं असून इथे पार्किंगचा मोठा गोंधळ पहायला मिळतो. काही ठिकाणी “नो पार्किंग” बोर्ड असूनही त्याची सर्रास पायमल्ली केली जाते. वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभी केल्याने आपत्कालीन सेवा देखील अडकतात.
काही भागांत देखील निवडक आणि अपारदर्शक कारवाई करून दुजाभाव केला जातो, असा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.





