
शेतकरी कर्जमाफीवर उठविणार आवाज,विद्यार्थी व दिव्यांगानाही निमंत्रण
अमळनेर:-प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू यांची अमळनेर येथे 5 ऑक्टोबरला जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून या सभेत शेतकरी कर्जमाफीवर आवाज उठविणार असुन सभेत जिल्ह्यातील शेतकरी बांधव,विद्यार्थी व दिव्यांगानाही निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

इंदिरा भुवन अमळनेर येथे रविवारी दुपारी 2 वाजता ही सभा होणार आहे. यासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष शिवराम पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की या सभेसाठी जळगांव जिल्ह्यातील सर्व शेतकरी, सर्व संघटना, विद्यार्थी आणि दिव्यांग बांधवांना जाहिर आमंत्रण आम्ही दिले असून बच्चु कडू यांचे मार्गदर्शन सर्वाना मिळावे म्हणून अमळनेर येथे शेतकऱ्यांसाठी सार्वजनिक सभेचे आयोजन आम्ही केले आहे.आज रोजी शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भयंकर वाईट आहे. शेतकरी जगला नाही तर व्यापारी टिकणार नाही. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी कॉलेज व शाळेत जाता येणार नाही. म्हणून शेतकरी जगवणे, टिकवणे आमची तुमची सर्वांची जबाबदारी आहे. आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते संवेदनशिल असल्याने यात सर्वात आधी पुढाकार घेत आहोत,सर्वानी या अभियानात उस्फुर्तपणे “बळी राजा” साठी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.सदर सभेसाठी अमळनेर तालुक्यातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष,काँग्रेस पार्टी व शिवसेना उध्दव ठाकरे गट हे देखील सहकार्य व योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले.सभेला जिल्हाध्यक्ष शिवराम पाटील, माजी आ.डॉ बी एस पाटील व महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.याशिवाय शेतकरी कर्जमाफी वर भूमिका मांडण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना आम्ही निमंत्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तरी सर्वानी सभेला उपस्थिती द्यावी असे आवाहन सभेचे आयोजन तथा प्रहारचे अमळनेर तालुकाध्यक्ष संतोष पाटील,संचालक प्रा पवन पाटील,युवक अध्यक्ष रवी पाटील,दिव्यांग अध्यक्ष दिलीप कासार,प्रदीप बोरसे व दिनेश पाटील यासह महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले आहे.





