
अतिक्रमण केलेल्या व वाहतूक कोंडीस जबाबदार असणाऱ्या मोठ्या दुकानदारांवर ही कारवाईची मागणी…
अमळनेर : नगरपरिषदेने धुळे रस्त्यावरील अतिक्रमित टपऱ्या आणि हातगाड्या हटवल्या आहेत. यात बऱ्याचश्या टपऱ्या बंद अवस्थेत होत्या. सहा टपऱ्या पालिकेत जमा करण्यात आल्या आहेत. मात्र पालिकेकडून कारवाई करताना दूजाभाव होत असल्याचे चित्र दिसत असून बाजारपेठेत व इतर ठिकाणचे अतिक्रमण व वाहतूक कोंडी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही की, मुद्दाम दुर्लक्ष केले जात आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरातील पाचपावली देवी मंदिराजवळ पोलीस कवायत मैदानावर महसूल आणि प्रशासकीय इमारत बांधली जात आहे. काही टपरी धारकांनी आधीच धुळे रस्त्यालगत टपऱ्या टाकून जागा सांभाळून ठेवल्या होत्या तर काहींनी फुटपाथ देखील सांभाळून आपला व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती. पायी चालणाऱ्याना देखील जागा मिळत नव्हती.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अतिक्रमण विभागाला अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या. अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल,विकास बिऱ्हाडे, अविनाश बिऱ्हाडे, जितू चावरीया, यतीन चव्हाण, भूषण चव्हाण, सुनील संगेले यांनी पंधरा टपऱ्यांचे अतिक्रमण काढून घेतल्या आहेत. त्यापैकी काहींनी आपआपली अतिक्रमणे काढून टपऱ्यांचे , हातगाड्यांचे साहित्य स्वतः काढून घेतले. तर सहा टपऱ्या ट्रॅक्टर मध्ये भरून पालिकेत जमा केल्या आहेत.यातील बऱ्याचश्या टपऱ्या बंद अवस्थेत होत्या. फक्त हातावर पोट असणाऱ्यावर कारवाई न करता इतर ठिकाणी अतिक्रमण केलेल्या व वाहतूक कोंडीस जबाबदार असणाऱ्या मोठ्या दुकानदारांवर ही अतिक्रमण विभागाने अशीच कारवाई करावी अशी मागणी होत आहे.




