
आमदार अनिल पाटील यांचे कृषी मंत्री भरणे यांना पत्र…
अमळनेर :- तालुक्यातील खेडी बु. येथील शेतकऱ्यांच्या मका पिकांना दाणे न लागल्याने शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली असून याबाबत आमदार अनिल पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना याबाबत पत्र व्यवहार केला आहे.

खेडी. बु. प्र. डांगरी येथील शेतकरी सुदाम पाटील, विश्वास पाटील, गोटूसिंग परदेशी, ज्ञानेश्वर पाटील, गोकुळ पाटील यांनी एडव्हाटा कंपनीचे मका बियाणे खरेदी केले होते. जून महिन्यात शेतात मका लागवड करण्यात आली होती. मात्र मका पिकाला दाणेच आले नसल्याने संबंधीत शेतकऱ्यांनी १० सप्टेंबर रोजी तालुका कृषी कार्यालयात तक्रार केली होती. गोकुळ भास्कर पाटील यांनी अमळनेर येथील श्री. गणेश एग्रो एजन्सी येथून बॅच नं. 48051 मका बियाणे खरेदी केले होते. तर इतर शेतकऱ्यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या कृषी केंद्रावरून मका बियाणे खरेदी केले होते.
ता.१९ सप्टेंबर रोजी बाधित शेतकऱ्यांच्या शेती क्षेत्राला उपविभागीय कृषी अधिकारी सी. डी. साठे, तालुका कृषी अधिकारी कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी हेमंत बाहेती, एस. पी. वानखेडकर मका पिकाची पाहणी करीत पंचनामा करण्यात आला आहे. यात पाच बाधित क्षेत्राला भेट देत पाहणी करून बाधित क्षेत्रात ७०% टक्के उत्पन्नात घट आली असल्याचे सांगितले तर मका कणसे त्रिशूल अवस्थेत आढळून आले आहेत.याबाबत सदर शेतकरी ग्राहक मंचात तक्रार करणार आहेत.
आमदारांचे कृषी मंत्र्याना पत्र…
आमदार अनिल पाटील यांनी कृषी मंत्री अनिल पाटील यांना याबाबत पत्र व्यवहार केले असून खेडी येथील शेतकऱ्यांनी एडव्हाटा कंपनीचे मका बियाणे यात बॅच नं- 006, 001, 0115, 48051 लागवड केली होती. मात्र कणसांना दाणेच लागले नसल्याने त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.




