
तालुका काँग्रेस कमिटीकडून प्रांतधिकारी यांना निवेदन…
अमळनेर:- तालुक्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला अगदी तुरळक पाऊस झाला होता. तेव्हा पाऊस कमी असल्याने, पिकांची वाढ खुंटली. परंतु सप्टेंबर महिन्यात संपूर्ण तालुका भर दमदार पाऊस झाला, तो आत्तापर्यंत सुरूच आहे. त्यामुळे अमळनेर तालुक्यातील शेतकरी व सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यात पांदण रस्ते पूर्णतः खराब झाले आहेत. त्यावर जनावरांना व माणसांना चालणे देखील जिकिरीचे, अवघड झालेले आहे. तर, गाव खेड्यातल्या कच्च्या घरांची पडझड झालेली आहे. लोक इकडे तिकडे तात्पुरता आसरा घेत आहेत. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांचे मका, कपाशी, सोयाबीन आदी पिकांना फटका बसला आहे. पावसाळी वातावरणामुळे कीटकांचे प्रमाण वाढून, रोगट वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळे कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंड अळी व लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. सोयाबीन पिकाचे तर आधीच तीन तेरा वाजलेले आहेत. अशा परिस्थितीत अमळनेर तालुक्यातील पिकांचे “दुरून डोंगर साजरे” अशी परिस्थिती असून उत्पादनात मात्र 80 ते 90 टक्के पर्यंत घट येणार आहे. अशातच तालुक्यातील पिकांची नजर आनेवारी 60 च्या पुढे लावलेली आहे.

अशा परिस्थितीत शासनाने अमळनेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी.व पांदण रस्त्यांचे दुरुस्तीचे नियोजन करून काम सुरू करावे. नजर आने वारी वास्तविकतेला धरून कमी करावी. शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केली आहे.




