
अंदाजपत्रकात सिमेंट काँक्रीटीकरणाला तीन ते चार मीटरवर ग्रुव्ह कटर करण्याची तरतूद असताना ठेकेदारासह पालिका अभियंत्यांना पडला विसर….
कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, नित्कृष्ट काम करणाऱ्या पालिकेच्या ठेकेदाराला काळया यादीत टाकण्याची नागरिकांकडून मागणी…
अमळनेर – शहरातील मुख्य रस्ता असलेला पिंपळे रोड काही महिन्यापूर्वीच दोन कोटी रुपये खर्च करून पालिकेने नव्याने काँक्रीट रस्ता बनवला होता. परंतु सध्या स्थितीत या नवीन रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. पडलेल्या भेगांमुळे दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणीतून मार्ग काढावा लागत आहे. शिवाय अपघाताचाही धोका बळावला आहे.

आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंय अशी परिस्थिती सध्या तालुक्यात सुरू असून ठेकेदारांचे लाड पुरवण्याकरता नागरिकांच्या कररुपी पैशांचा अपव्यय सुरू आहे. पिंपळे रोड हा वाहतुकीसाठी महत्त्वाचा असल्यामुळे या रस्त्यावरून दररोज दुचाकी, चारचाकी वाहनांसह हजारो अवजड वाहनांची मोठी रेलचेल असते. दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे पूर्वी असलेला डांबरी रस्ता खराब झाला होता. शिवाय सदरील रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत होता. परंतु पिंपळे रोड परिसरातील नागरिकांची चांगला रस्ता करण्याची मागणी सातत्याने झाल्यामुळे या ठिकाणी पालिकेने सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनवला आणि रस्त्याचे रुंदीकरणही केले आहे.
परंतु रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणाला तीन ते चार मीटर वर काँक्रीटीकरणाचे काम चालू असताना ग्रुव्ह कटर करण्याची अंदाजपत्रकात तरतूद असताना देखील ठेकेदार व पालिका बांधकाम विभागाच्या अभियंतांना विसर पडल्यामुळे सध्या स्थितीत या रस्त्याची अवस्था ही पूर्वीप्रमाणेच झाली आहे. सिमेंट रस्ता असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठ्या लांबच-लांब भेगा पडल्या आहेत. शिवाय अनेक ठिकाणी खड्डेही पडल्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.
सदर रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असून असे निकृष्ट काम करणाऱ्या पालिकेच्या ठेकेदाराला काळया यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकण्याची कारवाई करून रस्त्याच्या देखभाल दुरुस्ती कार्यकाळ ठेकेदाराचा असल्यामुळे या रस्त्याची पालिकेने ठेकेदाराकडून तातडीने दुरुस्ती करावी. अशी मागणी पिंपळे रोड परिसरातील नागरिकांनी केली आहे.या रस्त्यासंदर्भात पालिका बांधकाम विभागाच्या अभियंतांना भ्रमणध्वनी लावून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल होते.
नव्यानेच कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या संपूर्ण काँक्रीट रस्त्याला एक ते दोन मीटर वरच मोठे व लांबच-लांब तडे पडलेले असून पालिकेने त्वरित तडे बुजविण्याच्या उपाययोजना करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी.
आर.एस. बोरसे, नागरिक, पिंपळे रोड,अमळनेर
सदर कामाबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या असून संबधित ठेकेदारी नोटीस देण्यात येईल व नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. :- तुषार नेरकर मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद




