
स्पष्टवक्तेपणा व लेखणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय देणाऱ्या व्यक्तिमत्वास सर्वसामान्य जनतेची पसंती…
अमळनेर:- शहरातील सुपरिचित पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र ठाकूर यांनी अमळनेर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले असून आपल्या सडेतोड आणि निर्भीड पत्रकारितेमुळे जनमानसात ओळख निर्माण केलेले ठाकूर यांनी आता थेट जनसेवेच्या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनुभवी व समस्यांची जाण असलेल्या या नेतृत्वास सर्वसामान्य जनतेची पसंती मिळत आहे.

काल ६ रोजी अमळनेर नगराध्यक्ष पदासाठीचे एसटी आरक्षण निघाल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी अनेकांच्या ओठी जितेंद्र ठाकूर यांचे पहिले नाव आले. जितेंद्र ठाकूर हे गेल्या कित्येक वर्षा पासून पत्रकारितेच्या माध्यमातून शहरातील सामान्य नागरिकांच्या समस्या, भ्रष्टाचार, नागरी प्रश्न आणि प्रशासनातील हलगर्जीपणावर प्रकाश टाकत आले आहेत. त्यांचे लेखन आणि बातम्या वेळोवेळी चर्चेचा विषय ठरले असून त्यांनी विविध सामाजिक चळवळींमध्ये सक्रीय सहभाग नोंदवला आहे. “समस्या दाखवणं हे माझं कर्तव्य होतं, आता त्या सोडवण्यासाठी पुढे येणं ही देखील जबाबदारी आहे,” असे वक्तव्य करत ठाकूर यांनी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांचा उद्देश अमळनेर शहराचा सर्वांगीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांचा थेट सहभाग असलेली लोकाभिमुख कार्यपद्धती राबविण्याचा असल्याचे समर्थकांकडून सांगण्यात येत आहे. शहरातील विविध सामाजिक संस्था, युवक वर्ग, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या गटातून त्यांच्या या निर्णयाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अनेक नागरिकांनी सोशल मिडिया आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
शहरात नगराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत, मात्र जितु भाऊ ठाकूर यांची पारदर्शक प्रतिमा आणि पत्रकारितेच्या माध्यमातून शहरातील सर्व स्तरातील जनतेशी असलेला थेट संपर्क यामुळे त्यांच्या नावाला विशेष वजन प्राप्त झाले आहे. स्पष्टवक्ते व सर्वांना न्याय देणारा माणूस म्हणून जितू ठाकूर हे ओळखले जातात. तसेच नागरिकांची पसंती व जितू भाऊ यांच्याभोवती असलेला मित्रांचा मोठा गोतावळा यांच्या आग्रहास्तव जितेंद्र ठाकूर यांनी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. खंबीर उमेदवारास जनतेची तेवढीच खंबीर साथ असून तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांची ही त्यांना साथ लाभणार आहे.




