
बच्चू कडूंचे सरकारवर टीकास्त्र, अतिवृष्टीग्रस्तांना नुकसानभरपाईची मागणी…
अमळनेर:- येथील इंदिरा भवनात आयोजित शेतकरी मेळाव्यात माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकार आणि समाजातील निष्क्रियतेवर जोरदार हल्ला चढवला. सायं. ४ वाजता अमळनेर येथे आगमन झाल्यानंतर त्यांनी जिजामाता गेट समोरील बळीराजा स्मारकावर अभिवादन केले आणि ओपन जिपमधून इंदिरा भवन येथे पोहोचले. तेथे महापुरुषांना अभिवादन करून माजी आमदार बी. एस. पाटील व प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्वागत केले.

जिल्हाध्यक्ष शिवराम पाटील आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल तीव्र संताप व्यक्त करत जिल्ह्यातील मंत्री व आमदारांवर जोरदार टीका केली. यानंतर भाषणात बच्चू कडू म्हणाले, “राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत आणि दोघेही बनिया आहेत! शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, आत्महत्या सुरूच आहेत — मग असं जगायचं कशासाठी?” ते पुढे म्हणाले, “कोट्यवधी उद्योगपतींचे कर्ज माफ होतात, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नसतात, हे अन्यायकारक आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांनी एकजुटीने लढून हमीभाव मिळवला; आपण मात्र गप्प बसलो आहोत.”
अतिवृष्टीग्रस्तांना नुकसानभरपाई आणि दिव्यांगांचे मानधन वाढविण्याची मागणी केली. तसेच शेतकरी बांधवांना नागपूर येथील आंदोलनात सामील होण्याचे आवाहनही केले.
शेतकऱ्यांमधील उदासीनतेबद्दल बोलताना कडू म्हणाले,
“आज शेतकऱ्यांसाठी लढणे म्हणजे मूर्खपणा झाला आहे, कारण लोकांमध्ये उत्साह नाही. प्रत्येक जण आपल्या पक्षाचा गुलाम झाला आहे.”
या मेळाव्यात माजी आमदार बी. एस. पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराम पाटील, तालुकाध्यक्ष संतोष पाटील, प्रहार युवक तालुकाध्यक्ष रवी पाटील, संदीप घोरपडे, प्रशांत निकम, नितीन निळे, डी. एम. पाटील, महाविकास आघाडी,व प्रहार संघटनेचे असंख्य कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.




