
अमळनेर :- तालुक्यातील बोहरा येथील रहिवासी प्रकाश ओंकार पाटील यांना रस्त्यावर मिळून आलेली मूळ कागदपत्रांनी भरलेली बॅग मूळ मालकाला परत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बोहरा येथील माजी उपसरपंच प्रकाश ओंकार पाटील हे सोनगीरवरून परत येत असताना त्यांना अजंदे वालखेडा गावादरम्यान रस्त्यावर मूळ कागदपत्रांनी भरलेली एक बॅग आढळून आली. त्यांनी बॅग घेऊन तत्काळ मारवड येथे येत पत्रकार डॉ. विलास पाटील यांची संपर्क साधत सदर बॅग मारवड पोलीस स्टेशनला जमा केली. व तेथून बॅगेत असलेल्या कागदपत्रांवरून मुळ मालकाला फोन लावला असता सदर बॅग सोनगिर येथील दिनेश सुरेश देवरे यांची असल्याचे समोर आले. मुळ मालक दिनेश देवरे यांनी तात्काळ मारवड पोलीस स्टेशनला गाठत सदर बॅक ताब्यात घेतली. या बॅगेत त्यांचे आधारकार्ड, पॅन कार्ड, महत्त्वाची कोर्टाची कागदपत्रे व इतर मूळ कागदपत्रे होती. त्यांनी यावेळी प्रकाश ओंकार पाटील यांचे आभार मानले. सदर बॅग परत केल्यामुळे मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जीभाऊ पाटील यांनी प्रकाश पाटील यांचा विशेष सत्कार केला. यावेळी पत्रकार डॉ. विलास पाटील, हेडकॉन्स्टेबल संजय सूर्यवंशी, दिनेश देवरे व इतर उपस्थित होते.




