
१३ रोजी सदस्यांची आरक्षण सोडत, अनेकांचे गुडघ्याला बाशिंग…
अमळनेर-येथील पंचायत समितीचे सभापतीपद नामाप्र(ओबीसी) या प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून या प्रवर्गातील जो सदस्य विजयी होईल त्यास सभापती पदाची संधी मिळणार आहे.
काल जळगाव येथे ही आरक्षण सोडत काढण्यात आली.तर 13 ऑक्टोबर रोजी अमळनेर येथे पंचायत समिती सदस्यांसाठी गणनिहाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.अमळनेर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 5 गट असून या अंतर्गत प्रत्येक गटात दोन गण म्हणजे एकूण दहा गण आहेत.मागील निवडणूकित पं स चे ८ गण असताना यंदा एक जि.प.गट वाढल्याने त्यासोबत दोन गणही वाढले आहेत.
हे आहेत पंचायत समितीचे गण-पातोंडा,अमळगाव, डांगरी, कळमसरे , जानवे, मंगरूळ, मुडी, मांडळ, दहिवद, सारबेटा
आता 13 रोजी गणनिहाय कोणते आरक्षण निघते याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून आहे. दरम्यान गेल्या पंचायत समितीचा कार्यकाळ संपून 3 वर्ष उलटली असून आता निवडणूक होण्याचे संकेत मिळाल्याने इच्छुक जोरदार तयारीला लागले आहेत. अनेकांनी आतापासूनच रसोड्याला सुरुवात केली आहे. गण आणि गटातून गायब झालेले काही उमेदवार आता मात्र ग्रामस्थांच्या पाया पडताना दिसून येत आहेत.




