
अमळनेर:- तालुक्यातील मांडळ व कळंबू येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरू झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच्या सहाय्याने डंपर भरले जात आहेत.
पांझरा नदीतून मांडळ व कळंबू येथून वाळू सुसाट सुरू झाल्याने अवैध वाळू वाहतुकीला पुन्हा ग्रीन सिग्नल मिळाल्याचे चित्र आहे. कळंबू गावाजवळील रेल्वेपुलाजवळ मोठ्या प्रमाणावर वाळूचा ठिय्या करण्यात आला आहे.
तालुक्यात डंपरने सकाळी मुरुम व रात्री वाळू वाहतूक सुरू असून वाळू वाहतुकीला मागील पॅकेजमध्येच दहा दिवसांची सूट दिली असल्याची माहिती आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा वाळू सुसाट सुटली आहे. त्यामुळे या वाळू माफियांवर कोणाचा आशिर्वाद आहे ? हे संपूर्ण तालुक्याला कळून चुकले असून तालुका प्रशासन कशाच्या ओझ्याखाली दबले आहे हे ही सर्वज्ञात झाले आहे.




