
पकडलेल्या वाळू चोरांवर शासन निर्णयानुसार कारवाई करण्याची हिंमत प्रशासन दाखवणार का ?
अमळनेर:- तालुक्यातील मौजे आर्डी – जवखेड़े रस्त्यावर महसुलच्या पथकाने वाळू वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर पकडून तहसील आवारात जमा केले आहेत.
तालुक्यात सर्वत्र डंपरने वाळू उपसा सुरू असताना महसुलच्या पथकाने दोन ट्रॅक्टर पकडत दुधाची तहान ताकावर भागवली आहे. ट्रॅकर पकडणाऱ्या पथकात मंडळ अधिकारी पी. एस. पाटील , महसूल अधिकारी संदीप माळी, एम आर पाटील, विक्रम कदम, जितेंद्र पाटील, विकेश भोई , अमोल चक्रे , आकाश गिरी , सुधीर पाटील , पवन शिंगारे हे होते. दरम्यान याचदिवशी कन्हेरे गावाजवळ दोघात आणि एका ट्रॅक्टर मालकात आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा गावभर पसरली आहे.
शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार का ?
वाळू चोरावर शास्ती लावत फौजदारी कारवाईचे अधिकार स्थानिक अधिकाऱ्यांना राज्य शासनाने दिले असून १७ जुलै रोजी शासन निर्णयानुसार ही कारवाई करणे आवश्यक असताना ही अनेक पकडलेली वाहने केवळ शास्ती लावून सोडून देण्यात आली आहेत. त्यामुळे शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची हिंमत अधिकारी दाखवणार का ? हा खरा सवाल आहे.




