
तालुका प्रशासनाने बोध घेण्याची गरज, कारवाईत भेदभाव बनतेय असंतोषाचे कारण…
अमळनेर:- तालुक्याच्या वेशीवर वाळूचोरांकडून ग्राम महसूल अधिकाऱ्याला ट्रॅक्टर खाली फेकून दिल्याची खळबळजनक घटना घडल्याने आता तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग येईल का ? असा सवाल जनता विचारू लागली आहे.
बुधगाव येथे नदीपात्रातून वाळू भरून येणारे ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात नेत असताना ग्राम महसूल अधिकारी अनंत माळी हे ट्रॅक्टर वर बसले होते. त्यांच्याशी वाद घालून तुंबळ हाणामारी करण्यात आली , व त्यांना ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली फेकण्यात आले. याप्रकरणी दोघांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जरी चोपडा तालुक्यातील असली तरी अमळनेर तालुक्याच्या वेशीला लागूनच असल्याने तालुक्यातही त्याठिकाणाहून डंपर भरून वाळू येत असते.
कारवाईत भेदभाव बनतेय असंतोषाचे कारण…
तालुक्यात तापी, पांझरा व बोरी नदीतून चोरटी वाळू वाहतूक पुन्हा सुरू झाली असून डंपरने वाळू वाहून नेली जात आहे. मात्र महसूल प्रशासनाकडून ट्रॅक्टर, टेम्पो यांच्यावर कारवाई केली जात असून डंपरवाले मोठे मासे मोकाट सुटल्याने अनेकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. बाहेर गावाहून येऊन गावच्या नदीतून डंपरने वाळू वाहून नेली जाते आणि कारवाई मात्र गावपरीसरातील ट्रॅक्टरवर केली जात असून या भेदभावामुळे स्थानिक पातळीवर ही असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात तालुक्यात अशी घटना घडल्यास आश्चर्य वाटणार नाही.
तालुक्यात मोठ्या माश्यांना सूट मिळत असल्याने प्रत्यक्ष ग्राऊंडवर काम करून कारवाई करणाऱ्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत असल्याचे या घटनांमुळे दिसून आले आहे.मागे एका तलाठ्याला मांडळ परिसरात धमकी देत शिवीगाळ केल्याची घटना घडली होती.
अशा घटना तालुक्यातही घडत असल्याने आता यातून तरी अधिकारी बोध घेऊन निरपेक्ष कारवाई करतील अशी आशा आहे.




