
तरुणाची सतर्कतेने ५० हजार वाचले, दुसरा चोरटा गेला पळून
अमळनेर : वृद्धाचा बँकेपासून पाठलाग करून ५० हजार रुपयांची बॅग हिसकावून पळणाऱ्या अल्पवयीन मुलाला एका तरुणाने झडप घालून पकडल्याची घटना पैलाड भागात दुपारी घडली. दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
पैलाड येथील तुकाराम भोई हे १३ रोजी दुपारी बडोदा बँकेत पन्नास हजार काढायला गेले होते. मोटरसायकलच्या डिक्कीत पैसे ठेवून ते घराकडे निघाले असता दोन मुलांनी एका स्कूटी वर त्यांचा पाठलाग केला. स्कूटी वर बसलेला मुलगा काही अंतरावर थांबला. लहान मुलाला त्याने तुकाराम भोई यांच्याकडे पाठवले. ते मोटरसायकलच्या डिक्कीतून पैसे काढत असताना अल्पवयीन मुलाने त्यांच्या हातातील पन्नास हजार रुपये पळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरड करताच जवळच असलेल्या रोहित भागवत पाटील याने त्या अल्पवयीन मुलावर झडप घातली आणि त्याला पकडून त्याच्या हातातील पैसे तुकाराम भोई याना परत केले. हे पाहताच दुसरा मुलगा स्कूटी घेऊन पळून गेला. रोहितने चोरट्याला पकडून पोलीस कॉन्स्टेबल मंगल भोई व हेडकॉन्स्टेबल विनोद भोई याना कळवले. दोघांनी त्याला पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासमोर हजर केले. निकम यांनी सखोल विचारपूस केल्यावर त्या बालकाने सांगितले की, आम्ही दोन जण मध्यप्रदेशातून रेल्वेने अमळनेर आलो. दुसऱ्या मुलाने मला स्टेशनवर थांबवून थोड्या वेळानंतर स्कूटी आणली. नंतर आम्ही त्यावर बसून बँकेजवळ गेलो आणि वृद्धाचा पाठलाग करून पैसे पळवण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने डीबी पोलिसांना पाठवून दुसऱ्या आरोपीचा शोध घ्यायला सांगितले.
मध्यप्रदेशातील एका गावात बॅग लिफ्टिंग करणारी टोळी असून अल्पवयीन मुलांचा वापर करतात आणि चोरीतील काही हिस्सा त्या गावच्या प्रमुखाला देतात. नागरिकांनी बँकेत जाताना सावधानता बाळगावी असे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे.




