
अमळनेर : अवर्षण, पिकांवरील रोग आणि नुकसानभरपाईबाबत शासनाच्या बनवाबनवीविरोधात महाविकास आघाडीतर्फे १५ ऑक्टोबर रोजी उपविभागीय कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
अमळनेर तालुका अवर्षणप्रवण क्षेत्र असून, यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जून महिन्यात पेरणी झाल्यानंतर काही दिवस पाऊस झाला, परंतु जुलै ते ऑगस्टदरम्यान मोठा खंड पडल्याने उडीद, मूग, सोयाबीन, मका आदी पिकांचे नुकसान झाले. नंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या सतत पावसामुळे कापसाच्या पिकावर ‘लाल्या’ रोगाचा प्रादुर्भाव झाला. परिणामी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णतः हातातून गेला.
शासनाने नुकत्याच झालेल्या पंचनाम्यानुसार केवळ १५८६ शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र प्रत्यक्षात तालुक्यातील बहुतांश शेतकरी नुकसानीच्या गर्तेत आहेत. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करून ७/१२ कोरा करावा, तसेच २०२१ मधील अतिवृष्टीचे प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच हमीभावानुसार मका, ज्वारी, कापूस, सोयाबीन आणि तूर यांच्या शासकीय खरेदीला सुरुवात करावी आणि खरीप पिकांसाठी पीकविमा मंजूर करावा अशीही मागणी करण्यात आली आहे.
या मोर्चात माजी खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, किसान काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे एकत्र जमावे, असे आवाहन किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष पाटील, प्रा. अशोक पवार, सुरेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तालुकाध्यक्ष राजेंद्र मराठे, काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी, कारभारी आहेर, धनगर पाटील, प्रशांत निकम, देवेंद्र देशमुख, गजेंद्र साळुंखे, संदीप घोरपडे, चंद्रशेखर भावसार, मोहन भोई, दिनेश पवार आणि मनोहर पाटील यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आयोजित या जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाचे लक्ष वेधावे, असे आवाहन आयोजकांनी सर्व शेतकरी बांधवांना केले आहे.




