
तीन चोऱ्यांच्या शोधासाठी अमळनेर पोलिसांनाच सीसीटीव्ही फुटेज मिळेना…
अमळनेर : स्टेट बँकेच्या एटीएम मधील कॅमेऱ्यांचे खाजगीकरण झाल्याने एटीएम मधून पैसे काढणे असुरक्षित झाले आहे. एटीएम मध्ये नागरिकांना फसवून कार्ड बदल करून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तीन चोऱ्यांमध्ये दहा दिवस उलटूनही स्टेट बँक फुटेज देऊ शकत नसल्याने चोराना शोधणे अवघड झाले आहे.
माधवराव हिरामण चौधरी हे सेंट्रल बँकेच्या एटीएम मधून पैसे काढतांना कोणीतरी हात चलाखीने एटीएम कार्ड बदली करून घेतले. नंतर संबंधित अज्ञात व्यक्तीने वेगवेगळ्या एटीएम मधून ५३ हजार ७०० रुपये काढून घेतले. त्यात २ ऑक्टोबर रोजी २ ते अडीच वाजेदरम्यान पारोळा नाक्यावरील स्टेट बँकेच्या एटीएम मशीन मधून पैसे काढण्यात आल्याचे समजल्याने पोलिसांनी तेथील फुटेज मागवले आहेत.
मनोहर रामकृष्ण पाटील रा शनीपेठ पैलाड हे १२ सप्टेंबर रोजी स्टेट बँकेजवळील एटीएम मधून पैसे काढत असताना एकाने कार्ड अदलाबदली करून २ ते ३:२० वाजेच्या दरम्यान ४० हजार रुपये काढून घेतले आहेत. अज्ञात चोरट्याने त्यांच्याजवळील संदीप प्रकाश जगताप याचे कार्ड मनोहर पाटलांना देऊन गेला. पोलिसांनी एटीएम चे सीसीटीव्ही फिटेज आणि संदीप जगताप याचा मोबाईल नम्बर ,पत्ता याचीही मागणी केली आहे.
तिसऱ्या प्रकरणात गोकुळ विनायक पाटील रा महावीर नगर हे १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास स्टेट बँकेजवळील एटीएम मधून पैसे काढायला गेले तेव्हा अज्ञात चोरट्याने कार्ड बदली करून सायंकाळी साडे सहा वाजता त्यांच्या खात्यातून ४० हजार रुपये चोरून नेले. याचेही फुटेज पोलिसांनी स्टेट बँकेकडून मागवले आहेत.
स्टेट बँक कर्मचारी ग्राहकाला यासंदर्भात सहकार्य करत नाहीत. मात्र पोलीस स्टेशनने ३ ऑक्टोबर पासून पत्रव्यवहार करून एटीएम मशीनचे फुटेज पोलिसांना मिळत नसल्याने चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांना अवघड जात आहे.
स्टेट बँकेकडून लवकर माहिती मिळत नाही. वरिष्ठांशी संपर्क साधला असता कॅमेऱ्यांचे खाजगीकरण झालेले आहे असे सांगण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजची काल मर्यादा असते. त्यामुळे पोलिसांना तपास कार्य करता येत नाही.- दत्तात्रय निकम , पोलीस निरीक्षक अमळनेर




