
कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा करून नुकसानीची तजबीज करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी…
अमळनेर : तालुक्यातील अंतुर्ली रंजाणे येथे कापसाच्या बोगस बियाण्यांमुळे कापसाचे उत्पन्न ७० टक्के कमी आले असून कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा करून नुकसानीची तजबीज करावी अशी मागणी तीन शेतकऱ्यांनी केली आहे.
सुभाष पोपट पाटील ,राजेश पाटील आणि उज्वला ज्ञानेश्वर पाटील या शेतकऱ्यांनी अमळनेर येथील तिरुपती ट्रेडर्स मधून यु एस ऍग्री सीड्स या कंपनीचे एकरी १२ क्विंटल उत्पन्न अपेक्षित असलेले बियाणे घेतले होते. जून महिन्यात लावणी केली त्यांनतर खते , निंदणी , फवारणी , खेडणी , तणनाशक ,मशागत करून देखील कपाशी लाल झाली. फवारणी करून देखील उपयोग झाला नाही. सुमारे ७० टक्के नुकसान झाले आहे. हा प्रकार भेसळयुक्त बियाण्यांमुळे झाला आहे. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पंचनामा करावा आणि नुकसान भरपाईची तजबीज करावी अशी मागणी तिन्ही शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.





