
मा. खा. उन्मेष पाटील यांनी मदतीच्या मुद्द्यावरुन शिवराळ भाषेत काढले अधिकाऱ्यांचे इज्जतीचे वाभाडे
अमळनेर:- तालुक्यातील शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ सह विविध मागण्यांसाठी काढलेल्या आक्रोश मोर्चानंतर उपविभागीय कार्यालयात माजी खासदार उन्मेष पाटील मदतीच्या मुद्द्यावर आक्रमक होत त्यांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना शिवराळ भाषा वापरली.
ओला दुष्काळ जाहीर करावा ,हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान जाहीर करावे , शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करावा ,२०२१ च्या अतिवृष्टीचे अनुदान द्यावे यासह विविध मागन्यांसाठी महाविकास आघाडीतर्फे माजी आमदार डॉ बी एस पाटील , किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे,उपाध्यक्ष सुरेश पाटील जिल्हाध्यक्ष प्रा सुभाष पाटील , राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापासून शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढला. मोर्चा तहसील कचेरीबाहेर आल्यानन्तर सभेत रूपांतर झाले. यावेळी डॉ बी एस पाटील म्हणाले की शेतकरी मानसिकदृष्ट्या खचला आहे. आपण स्वाभिमान धर्म विसरलो आहोत. लोकप्रतिनिधी व्यापारी झाल्याने शेतकरी भिकारी झाले असे म्हणत त्यांनी खासदार आणि आमदारांवर कणखर टीका केली. माजी खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, स्मिता वाघ ह्या अपघाताने खासदार झाल्या आहेत. सरकार स्वदेशी मेळावे घेत असताना विदेशी कापूस भारतात आणला. आमदार खासदार सभागृहात बोलत नाहीत. प्रा सुभाष पाटील म्हणाले भारतात दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करत आहे. शेतकरी भूमिहीन होत आहेत.शासन शेतकऱ्यांना गरीब करत आहे. यावेळी पराग पष्टे , जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील ,सुरेश पाटील ,प्रा अशोक पवार , संदीप घोरपडे, कारभारी आहेर यांनीही मनोगत व्यक्त केले.
सभेनंतर मोर्चेकरी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे याना निवेदन द्यायला गेले तेव्हा माजी खासदार उन्मेष पाटील उपस्थित उपविभागीय अधिकारी , तालुका कृषी अधिकारी , नायब तहसीलदार यांच्यावर आक्रमक झाले. अधिकाऱ्यांना जीआरची देखील माहिती नसल्याने त्यांनी शिवराळ भाषेत जाब विचारत अधिकाऱ्यांच्या इज्जतीचे वाभाडे काढले. अमळनेर तालुक्याला परिशिष्ट अ प्रमाणे मदत मिळेल की नाही म्हणून जाब विचारू लागले. अमळनेर तालुक्याला परिशिष्ट अ प्रमाणे मदत न मिळता फक्त परिशिष्ट ब प्रमाणे महसूल कर माफ आणि विद्यार्थ्यांची फी माफ मिळेल हे ऐकताच उन्मेष पाटील संतापले आणि त्यांनी खासदार आणि आमदार यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरली. तालुक्यातील जनतेला ##त्या बनवण्याचे काम लोकप्रतिनिधी व अधिकारी करत असल्याचे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला.
अमळनेर तालुक्यात सतत पाऊस पडूनही पंचनामे का केले नाही म्हणून शेतकरी आक्रमक झाले. अधिकाऱ्यांनी ६५ मिमी पावसाची अट सांगितल्यावर त्यांनी शासनाने ६५ मिमी ची अट काढल्याचे सांगून आता पंचनामे करा अशी मागणी केली. यावर उपविभागीय अधिकारी मुंडावरे यांनी कृषी अधिकाऱ्यांना पंचनामे करायला सांगितले.
मोर्चात योजना पाटील , डी एम पाटील ,प्रशांत निकम , प्रा अशोक पवार ,बी के सूर्यवंशी , गजेंद्र साळुंखे , मनोहर पाटील, धनगर पाटील , शांताराम पाटील ,हर्षल जाधव , जाकीर शेख , मुन्ना शर्मा, ऍड रज्जाक शेख ,श्याम पवार , चिंधु वानखेडे ,अशोक पाटील, चंद्रशेखर भावसार, राजेंद्र मराठे, प्रवीण पवार, त्र्यंबक पाटील, शांताराम कोळी हजर होते. सूत्रसंचालन डी एम पाटील यांनी केले.




