
सहस्रचंद्र दर्शन सेवा स्फूर्ती सोहळ्याच्या प्रसंगी अरुणभाई गुजराथी यांचे प्रतिपादन…
अमळनेर : डॉ.बी. एस. पाटील राजकारणाबरोबर अध्यात्म आणि गरजू रुग्णांची मोफत सेवा करतात. त्यांच्या सेवेला अंत नाही. सेवेत कर्तव्याची भावना आहे. निम्न तापी पाडळसरे प्रकल्प पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना भाकरीत त्यांचा चेहरा दिसेल. असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी आयोजित केलेल्या सहस्रचंद्र दर्शन सेवा पूर्ती नव्हे स्फूर्ती सोहळ्याच्या प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात केले.

सतत १५ वर्षे आमदार असलेल्या माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी वयाची ८१ वर्षे पूर्ण केली असून राजकारणानंतर त्यांनी विपश्यना केंद्र आणि हृदयरोग तज्ञ नात्याने अनेक रुग्णांची सेवा केली आहे. त्यात अनेक गरजू रुग्णांची मोफत सेवा केली आहे. त्यांच्या जीवनात त्यांना ज्यांच्यामुळे सेवेची संधी मिळाली. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांनी आगळावेगळा स्फूर्ती सोहळा आयोजित केला होता.
यावेळी त्यांनी आश्रम शाळेत त्यांचे भाऊ प्रज्ञावंत कै. एस.एस. पाटील ,सासरे कै. अण्णासो हिराजी पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. स्वतः सत्कार न स्वीकारता त्यांच्या जीवनात सहकार्य करणाऱ्या मित्रांचा डॉ. एस. आर. पाटील , डॉ. गुलाबराव मराठे, डॉ. बाळकृष्ण देसले , डॉ. बी. आर.बाविस्कर , पी. व्ही. पाटील , सरजु गोकलाणी , प्रदीप भदाणे , प्राचार्य अजित वाघ सत्कार केला.
पुतळ्यांचे अनावरण होताच डॉ. बी. एस.पाटील यांचे पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले. त्यांनतर त्यांचा जीवनपट दाखवण्यात आला. यावेळी बोलताना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले की डॉ. बी. एस. पाटील शांत संयमी व्यक्तिमत्व असून त्यांना कधीच राग येत नाही. त्यांच्यामुळेच पाडळसरे धरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यांच्यावरच्या विश्वासामुळे मी जळोद पुलाचे भूमिपूजन आधी केले नंतर त्याला मंजुरी दिली. डॉ. प्रकाश पाठक म्हणाले की कर्तव्यतत्परता , कर्तृत्व , कृतज्ञ , कार्यमग्न , स्थितप्रज्ञ असे पैलू असलेले सत्पुरुष म्हणजे डॉ. बी. एस. पाटील होत. यावेळी डॉ. दिलीप पाटील व प्राचार्य डॉ.अजित वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यांनतर त्यांनी लिहिलेल्या ‘डॉ. बी. एस. आबा एक पंचामृत’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ.बी. एस. पाटील म्हणाले की हा कार्यक्रम माझ्या सत्कारासाठी नव्हता. तर ज्यांनी माझ्यावर प्रेम केले ,ज्या रुग्णांची मला सेवा करायला मिळाली.त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा सेवा स्फूर्ती सोहळा आयोजित केला होता. अमळनेरकर नागरिकांनी आजपर्यंत इतका शिस्तबद्ध, भावनाप्रधान, आटोपशीर,कार्यक्रम कधी बघितला नव्हता. अशी भावना लोकांनी व्यक्त केली. ती खरी वैचारिक मेजवानी होती. तेथे राजकीय पुढारी असून देखील राजकारणाचा गंधही नव्हता.
डॉ. बी.एस. पाटलांचे सुपुत्र डॉ. निनाद पाटील यांनी प्रमुख अतिथींचा सत्कार केला. संजय पाटील यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.




