
पॉक्सोसह अन्य कलमान्वये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल..
अमळनेर:- मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याने सात जणांनी तिघांना बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील हिंगोणे बू. येथे घडली असून याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे कामानिमित्त बडोदा येथे एकटे राहत असून हिंगोणे बु. येथे त्यांची पत्नी दोन्ही मुलीसह राहते. १० रोजी फिर्यादीस त्याच्या पत्नीचा फोन आला की, त्यांची १५ वर्षीय मुलगी घरात लहान बहिणीसोबत असताना हितेश मिलिंद साळुंखे याने घरात घुसून तिची छेड काढली. त्यामुळे फिर्यादीने लगेच गावाकडे निघून ११ रोजी गावी पोहचले. सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते घराजवळ एकटेच उभे असताना मिलिंद साळुंखे, हितेश मिलिंद साळुंखे, मनिषा मिलिंद साळुंखे, ललिता फकिरा थोरात, सीमा पवार, अशोक छगन थोरात, जिजाबाई अशोक थोरात हे जमा झाले. त्यावेळी मिलिंद याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर मारत त्याला खाली पाडले. वरील लोकांनी दगड विटांनी मारहाण सुरू केली. त्यावेळी फिर्यादीच्या पत्नी वाचण्यास आली असता तिलाही लाताबुक्क्यानी मारहाण करत विटा मारून फेकल्या. आजुबाजूच्या लोकांनी फिर्यादी व त्याच्या पत्नीची सोडवणूक करत त्यांना दुसऱ्या घरात आणले. त्यावेळी वरील नमूद लोकांनी फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस केसाने ओढून बाहेर काढले. त्यावेळी हितेश याने त्या मुलीच्या छातीवर बसत तोंडावर, छातीवर व डोक्यावर मारहाण केली व सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली. गावातील लोकांनी येऊन त्यांची सोडवणूक केली. फिर्यादीच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरू असून दवाखान्यात दिलेल्या जवाबावरून मारवड पोलिसांत सात जणांविरुद्ध पॉक्सोसह अन्य कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय विनोद पवार करीत आहेत.




