
अमळनेर– समृद्ध पंचायत राज अभियान २०२५ अंतर्गत दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी टाकरखेडा ग्रामपंचायतीच्या वतीने श्रमदानातून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. या उपक्रमात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी, स्थानिक शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
ग्रामपंचायतीच्या आवारात सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी टाकरखेडा शिवारातील निवडलेल्या ठिकाणी श्रमदान सुरू केले. धनदाई माता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रमदानात सहभाग घेतला. याचबरोबर कुलस्वामिनी जोगेश्वरी माता मंदिर ट्रस्ट चे पदाधिकारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी तसेच विकासप्रेमी नागरिकांनीही बंधारा उभारणीच्या कामात सक्रिय योगदान दिले. या सामूहिक प्रयत्नामुळे गावात पाणी साठवण क्षमता वाढून शेती व परिसराच्या हरित विकासाला चालना मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी सर्वांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले आणि पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली.




