
मलाईसह मिठाई ही मिळाल्याने अनेकांनी दिला तृप्तीचा ढेकर…
अमळनेर :- तालुक्यात वाळू माफियांसह अनेकांची दिवाळी सुरू झाली असून दिवाळीची मिठाई मलई खाल्ल्याने अनेकांची तोंडे बंद झाली आहे. त्यामुळे वाळूचोरीला उधाण आले असून मांडळ येथे ट्रॅक्टर डंपर धरसोड झाल्याची चर्चा होती.
जळोद येथील वाळू वाहतुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर वाळूचोरांनी आता तापी काठावरील हिंगोणे येथून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू केला आहे. नदीतून जेसीबी व ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा करून बाहेर आणून डंपर भरले जात असून मोठ्या प्रमाणावर डंपरची झुंबड उडाली आहे. गावापासून नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डंपरच्या वाहतुकीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला असून या कारणामुळे वाद ही झाल्याची माहिती आहे. कुचकामी आणि तुंबड्याभरु स्थानिक प्रशासनामुळे वाळू माफिया फक्त गावे बदलत असून वाळू उपसा जोमात सुरूच आहे.
मांडळ येथे डंपर ट्रॅक्टरची धरसोड…
काल मांडळ येथे दोन डंपर आणि तीन ट्रॅक्टर पकडल्याची चर्चा होती. मात्र यातील एकच ट्रॅक्टर तहसील आवारात पोहचले असून त्याप्रकरणी ही अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नाही. चार दिवसांपूर्वी ही पकडलेल्या तीन डंपर पैकी ओळखीचे आणि वरदहस्त असलेले दोन डंपर सोडत एका नवख्याला पकडत कारवाई करण्यात आली होती.
मलई मिठाई पोहचल्याने अनेकांनी दिला तृप्तीचा ढेकर
दिवाळीची मलई मिठाई पोहचल्याने अनेकांनी तृप्तीचा ढेकर दिला आहे. कनिष्ठांना पाच आणि सहाय्य करणाऱ्या वरिष्ठांना अकरा सह दोन मिठाईचे बॉक्स मिळाल्याने दिवाळी जोमात साजरी होणार आहे. तसेच मुख्य असलेल्या दोघांना थेट बंगल्यावर भेट देऊन मेवा पोच करण्यात आल्याची चर्चा जोमात आहे.




