
नर्मदा मेडिकल फाउंडेशनच्या डॉक्टरांनी मृत्यूच्या दाढेतून खेचून आणल्याने नातेवाईकांनी मानले आभार…
अमळनेर:- शेतात ऊस तोडताना विषारी साप चावल्याने मृत्यूशी झुंज देणाऱ्या दापोरी येथील तरुण महिलेचा जीव वाचविण्यात नर्मदा मेडिकल फाउंडेशनच्या डॉक्टरांना यश आले आहे.
दिनांक १७ रोजी आरती नितीन भील (वय २२, रा. अमळनेर) हिला शेतात ऊस तोडताना विषारी साप चावल्यानंतर तिला तीव्र विषबाधा झाली होती. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास, पापण्या झुकणे आणि स्नायूंची अशक्तता अशी गंभीर लक्षणे दिसून आल्याने तिची प्रकृती अत्यंत नाजूक झाली होती. रुग्णालयात दाखल होताच आपत्कालीन विभागाने त्वरित प्रतिसाद देत ऑक्सिजन, श्वसन सहाय्य व अँटी-स्नेक व्हेनम देत उपचार सुरू केले. डॉक्टरांनी प्रोटोकॉलनुसार निओस्टिगमिन व अॅट्रोपिन औषधे देत रुग्णाची सतत काळजी घेतली. फक्त २४ तासांतच तिच्या श्वसनात सुधारणा होऊन स्नायूंची शक्ती परत आली. आता उपचारानंतर अनिता पूर्णपणे बरी होऊन डिस्चार्ज देण्यात आला. नर्मदा मेडिकल फाउंडेशनकडे २४ तास कार्यरत आपत्कालीन विभाग, सुसज्ज ICU आणि जीवनरक्षक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने सर्पदंश, स्ट्रोक व हृदयविकाराच्या आपत्कालीन प्रकरणातही हे केंद्र नेहमी तत्पर असल्याचे डॉ. संदीप जोशी यांनी सांगितले. “वेळीच केलेला उपचार म्हणजे मृत्यूवर विजय” अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
अँब्युलन्स मिळेना उपचाराची परवड, डॉ. जोशींनी दिले जीवदान…
सदर महिला दापोरी पातोंडा येथील असून साप चावल्यानंतर महिलेला नेण्यासाठी १०८ ॲम्ब्युलन्स उपलब्ध झाली नाही. त्यामुळे महिलेचा पतीचे मालक मुकुंद विसपुते यांचा मुलगा अथर्व याने वेळीच धावून येत स्वतःच्या खाजगी वाहनाने सदर महिलेला पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले मात्र तेथे कोणीही उपलब्ध नसल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी प्रथमोपचार करत आयसीयू सुविधा नसल्याचे कारण देत धुळे येथे रेफर करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर शहरातील दोन रुग्णालयात ही महिलेची परिस्थिती पाहून तिथे प्रतिसाद मिळाला नाही. परंतु डॉ. संदिप जोशी व त्यांची टीम यांनी शर्थीचे प्रयत्न करून रुग्णास जीवदान दिल्याने नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले. सदर महिलेचे पती मुकुंद विसपुते यांच्या पेट्रोल पंपावर कामाला असून विसपुते यांनी डॉक्टरांना आधीच महिलेच्या प्रकृतीची कल्पना दिली होती. म्हणून योग्य वेळी योग्य उपचार मिळाल्याने विसपुते परिवाराचे ही महिलेच्या नातेवाईकांनी आभार मानले.
साप चावल्यास खाजगी गाडीने रुग्णालयात न्या…
ग्रामीण भागात शासनाच्या १०८/१०२ अँब्युलन्सचा लाभ मिळत नसून ग्रामीण जनतेने ह्या अँब्युलन्सच्या भरवश्यावर न राहता खाजगी वाहनाने रुग्णालय गाठणे परवडेल अशी परिस्थिती सध्या तालुक्यात आले. १०२ मिळाली नाही म्हणून मागे एका महिलेची ओट्यावरच प्रसूती झाली होती, सर्पदंश झालेल्या महिलेला ही १०८ मिळाली नाही. स्थानिक प्रशासनाचे त्यांच्यावर नियंत्रण नसल्याने मनमर्जी कारभार सुरू असून स्थानिक शासकीय डॉक्टरांवर याचे खापर फोडले जाते. गाड्यांची परिस्थिती ही विदारक असून अनेकदा ह्या ॲम्ब्युलन्स नादुरुस्त असतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी ह्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामीण भागातून केली जात आहे.
प्रतिक्रिया…
१०८ चा कंट्रोल पुणे येथे असून ग्रामीण रुग्णालय व त्यांचा काही संबंध नसून बऱ्याच वेळा ह्या गाड्या नादुरुस्त असतात. सदर महिला पेशंटवर ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशाची लस देऊन प्रथमोपचार करण्यात आले होते. आयसीयूची सुविधा नसल्याने महिलेला धुळे येथे रेफर करण्यात आले होते.
– डॉ. जी. एम. पाटील, ग्रामीण रुग्णालय, अमळनेर




