
अधिकाऱ्यांची दिवाळी वाळू माफियांच्या पथ्यावर, डंपर ट्रॅक्टर सुसाट…
अमळनेर:- अधिकाऱ्यांची दिवाळी सुरू असल्याने काल रात्रभर वाळू उपसा जोमात सुरू होता, त्यामुळे तालुक्यात लक्ष्मीपूजनाच्या आधीच वाळूमाफियांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्मीदर्शन झाले आहे.
दिवाळीची मलई मिठाई सप्रेम भेट मिळाल्याने अनेकांनी दिवाळी गोड झाली असून अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या ह्या वाळू माफियांच्या पथ्यावर पडल्या आहेत. जे यादीत नाहीत त्यांनीही संधीचा लाभ घेत ह्या दिवाळीच्या गर्दीत घुसून मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक केली आहे. काल रात्रभर तापी नदीतून हिंगोणा मार्गे वाळू वाहतूक सुरू होती. पांझरा नदीतून मांडळ, कळंबू, तर शहरात बोरी नदीतून ही जोरदार वाळू वाहतूक सुरू होती. अनेकांना दिवाळीचा बोनस मिळाल्याने ते खुशीत असून वाळूमाफिया ह्याच संधीचा मोठा लाभ घेत आहेत. आता नूतन जिल्हाधिकारी यांनी तालुक्यात लक्ष घालून निर्ढावलेल्या प्रशासनाला वठणीवर आणावे अशी मागणी होत आहे.




