
अमळनेर:- तालुक्यात दोन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतपिकांची दाणादाण उडवली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे उरलेसुरले उत्पन्न ही धोक्यात आले आहे.
ऐन मोक्याच्या वेळी पावसाची गैरहजेरी त्यानंतर ऑगस्ट मधील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील पिकांचा पूर्णपणे बोजवारा उडाला होता. तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत ही न मिळाल्याने आसमानी सह सुलतानी संकटांनी मारले, आता उरलेसुरले उत्पादन घेत असताना पुन्हा अवकाळी पावसाची अवकृपा झाल्याने पिकांची पूर्णपणे विल्हेवाट लागली आहे. मका, कापसाचे सर्वाधिक नुकसान झाले असून फळबागा केळी यांचेही नुकसान झाले आहे.
ग्रामीण भागात वादळी पावसाने सर्वत्र चांगलेच झोडपून काढले. शेत शिवारात मोडून पडलेला मका ज्वारी तसेच कापूस सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत मका सोयाबीन या धान पीकांना पाहिजे तसा हमी भाव विकत नसल्याने शेतकरी बांधवांनी ही पीक कापून व मोडून बांधावर गंजे मारून ठेवली आहेत. अशातच काल पासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे ही पीक पुर्णतः भिजून गेली आहेत. तालुक्यातील जवळपास मारवड भरवस तसेच वावडे या मंडळात जोरदार वादळी पाऊस पडला.यामूळे काही मिनिटांत शेतांमधून पाणी वाहू लागले होते. वादळीवारा व पाऊस जोरदार असल्याने शहरातील व ग्रामीण भागातील बराच वेळ पर्यंत विद्यूत पुरवठा देखील खंडित झाला होता.




