
तर दोघे गेले पळून, लेटलतीफ अधिकाऱ्यांनी येऊन ट्रॅक्टर दफ्तरी केले जमा…
अमळनेर:- तालुक्यातील पांझरा, तापी व बोरी नदीतून राजरोसपणे वाळूचोरी सुरू असताना महसूल प्रशासन कोमात गेल्याने आता पांझरा काठावरील ग्रामस्थांनीच एल्गार करत दोन ट्रॅक्टर पकडून तहसीलदारांना आयते सुपूर्द केले.
तालुक्यात सर्रास वाळूची संघटितपणे लूट सुरू असताना तालुका प्रशासनाकडून तालुक्यात वाळू बंद असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना देण्यात येते. महसूल प्रशासनाकडून कारवाई करत नसल्याने बाम्हणे, कळंबु, मुडी प्र.डा व बोदर्डे ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन काल २६ रोजी दुपारी दोन वाळू ट्रॅक्टर पकडले. त्यापैकी एक ट्रॅक्टर मुडी गावात, तर दुसरा कळंबू रेल्वे पुलाखाली पकडण्यात आला. ग्रामस्थांना पाहून वाळू भरायला आलेले इतर दोन खाली ट्रॅक्टर पळून गेले. त्यानंतर पकडलेले दोन्ही ट्रॅक्टर मुडी गावात एकत्र केले. या वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मारवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी हेमचंद्र सावे, भावेश देवरे उपस्थित होते. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मंडळ अधिकारी धनराळे, तलाठी सुधीर पाटील यांनी मूडी येथे येऊन ग्रामस्थांनी पकडून दिलेले ट्रॅक्टर नेऊन तहसील कार्यालयात जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
या संपूर्ण कारवाईत बाम्हणे, कळंबु, मुडी प्र.डा व बोदर्डे ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत पदाधिकारी, बाम्हणे पोलिस पाटील गणेश भामरे, बोदर्डे पोलिस पाटील चौधरी, मुडी प्र.डा येथील पोलिस पाटील केशव पाटील यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
याआधी ही ग्रामस्थानी पकडले होते ट्रॅक्टर…
पांझरेतून वाळू वाहतूक सुरू असताना महसूल निद्रिस्त अवस्थेत असल्याने पांझरा काठावरील ग्रामस्थांनीच वाळू वाहतूक थांबण्याचा निर्धार केला आहे. या आधी ही मांडळ, बोदर्डे, ब्राह्मणे येथे ग्रामस्थ व पोलिस पाटील यांनी जीवावर उदार होऊन वाळूचे ट्रॅक्टर पकडून दिले होते. ज्यांचे हे कर्तव्य आहे ते मात्र आयते पकडलेले ट्रॅक्टर नेण्यासाठी येतात आणि नंतर फोटोसेशन करत असतात. तालुक्यातील या अनागोंदी कारभाराची दखल आता जिल्हाधिकारी यांनी तरी घ्यावी अशी मागणी होत आहे.




