
अमळनेर – कृषी विभागाच्या साथी पोर्टलवरील विविध नियम, कायदे आणि विलंबित कार्यपद्धतीच्या निषेधार्थ अमळनेर तालुका सीड्स, पेस्टिसाईड्स, फर्टिलायझर असोसिएशनतर्फे २८ ऑक्टोबर २०२५ रोजी एकदिवसीय बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तालुका कृषी अधिकारी सी.जी. ठाकरे यांना निवेदन देताना अध्यक्ष योगेश पवार,उपाध्यक्ष प्रशांत भदाणे,सचिव मुन्ना पारख, विजय जैन, मगन पाटील, किरण पाटील, रवी पाटील, प्रदीप कंखरे आदी उपस्थित होते. यानुसार अमळनेर तालुक्यातील सर्व कृषी सेवा दुकाने, बियाणे, खत व कीटकनाशक विक्री केंद्रे २८ ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहेत.
असोसिएशनने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, साथी पोर्टलवरील नियम व कार्यपद्धतीमुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. शेतकऱ्यांना वेळेत सेवा पुरवण्यात अडथळे निर्माण होत असून शासनाने या समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या बंदला अमळनेर तालुक्यातील सर्व कृषी व्यावसायिकांचा सहभाग असणार आहे.




