
वाहनावर चालक म्हणून गेला होता चंद्रपूर, अंगावर मारहाणीच्या खुणा…
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील प्रफुल प्रकाश भदाणे (वय ३५) याचा मृतदेह संशयित रित्या चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आल्याने त्याचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रफुल भदाणे हा २२ रोजी एका वाहनांवर चालक म्हणून गेलेला होता. २४ रोजी प्रफुल चंद्रपूर च्या हद्दीत खंबाळा येथे जेवायला थांबला होता. काही वेळाने प्रफुलने त्याचा भाऊ प्रदीप प्रकाश भदाणे याला फोन आला की, काही लोक मला मारत आहेत आणि मी पळत आहे. प्रदीपने त्याला त्या मारणाऱ्या व्यक्तींजवळ फोन द्यायला सांगितला. प्रदीपने त्यांना विनंती केली की मी पैसे पाठवून देईन प्रफुलला दवाखान्यात दाखल करा. त्यांनी हो म्हटले आणि फोन बंद पडला. दोन तीन दिवस वाट पाहूनही भाऊ आला नाही आणि फोनही लागत नाही म्हणून प्रदीप अमळनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची खबर द्यायला गेला. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना कळताच त्यांनी तातडीने बंद मोबाईल चे लोकेशन काढून त्या भागातील पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता एक अनोळखी इसम मृत अवस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात आले. तिकडून काही फोटो पाठवले तेव्हा मयत इसम प्रफुल असल्याचे समजले. प्रफुलच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या आहेत. त्याचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा संशय त्याच्या भावाने व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रफुल चा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तेथील अधिकाऱ्यांनी वरोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्याचे नातेवाईक शव ताब्यात घेण्यासाठी चंद्रपूर कडे रवाना झाले आहेत.




