
८३८३ क्रमांकाला विशेष सवलत, सूट देण्यासाठी मोठा आर्थिक व्यवहार ?
अमळनेर:- एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील वाळूच्या ठेक्यावरून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक सुरू असून मोठ्या आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात ८३८३ क्रमांकाच्या गाड्यांना विशेष सवलत देण्यात आली असल्याची चर्चा आहे.
रात्रंदिवस उत्राण येथून वाळूची वाहतूक सुरू असून रात्रदिवस वाळू उपसा सुरू असल्याने स्थानिक महसूल विभागाचे ही दुर्लक्ष होत असल्याने दोन तीन तालुक्यातील अनेकांचे हात ओले झाल्याची शक्यता आहे. याच क्रमांकाची कार व मालक याने अमळनेर तालुक्यातील अधिकाऱ्याची शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याची चर्चा ऑगस्ट महिन्यात जोरात रंगली होती. त्यामुळे बाहेरच्या तालुक्यातल्या ठेक्यातूनही अनेकांनी खिसे गरम केले आहेत.
अमर्याद व बेकायदेशीर वाळू उपसा…
सक्शन पंपाने वाळू उपसा करण्यावर शासनाचे निर्बंध असताना ही याठिकाणी सक्शन पंपाने वाळू उपसा होत असल्याची माहिती आहे. त्याबाबत परवानगी आहे हे तपासणे गरजेचे आहे. तसेच वाळू उपसा करण्याची वेळ शासनाने ठरवून दिली असतानाही रात्री बेरात्री शहरात वाळू डंपर दाखल होतात. त्यामुळे रात्रभर वाळू उपसा होतो की काय ? याकडे स्थानिक महसूल विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच अनेक डंपर ओव्हरलोड भरून वाहतूक सुरू असून एकाच पावतीवर अनेक वाहने सुरू असल्याची तक्रारी आहेत.
विना पावती वाहतुकीसाठी गोळा केली मोठी रक्कम ??
विना पावती वाळू वाहतूक करायची असेल तर अंतरानुसार रेट ठरवण्यात आले असून पारोळा २५ हजार, अमळनेर व धुळे ५० हजार असे प्रति वाहन रक्कम गोळा करण्यात आल्याची माहिती आतल्या गोटातून मिळाली आहे.
चौकशी करण्याची मागणी…
या ठेक्यावरील अनेक गैरकारभार समोर येत असून अनेकांचे हात ओले केल्याची चर्चा असल्याने याबाबत जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावरील पथक पाठवून चौकशी करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.




