
अमळनेर:- सुरत–भुसावळ रेल्वे मार्गावरील अमळनेर–टाकरखेडा या दरम्यान असलेल्या कुऱ्हे गावाजवळील अंडर बायपास बोगद्यात पावसाचे पाणी साचल्याने प्रवासी व वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू होताच या बोगद्यात पाणी साचणे ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही. मात्र, यावर्षी या समस्येने तीव्र स्वरूप धारण केले आहे. बोगद्याच्या मध्यभागी तब्बल दोन फुटांचा मोठा खड्डा पडला असून, त्यात पाणी साचल्याने दुचाकीस्वार व चारचाकी वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे.
सततच्या पावसामुळे या बोगद्यात पाणी साचते, आणि त्यातच खड्डा असल्याने वाहनचालकांना दिशाभूल होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला होता. चारचाकी वाहनांच्या सायलेंसरमध्ये पाणी गेल्याने अनेक गाड्या बंद पडल्या आहेत.
स्थानिक नागरिकांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले असतानाही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. बोगद्याच्या दोन्ही बाजूंना पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य व्यवस्था करावी, तसेच बोगद्यातील खड्डा तातडीने दुरुस्त करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.
तसेच, वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी बोगद्याच्या भिंतींवर इशारा फलक व सूचना लिहाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने आता तरी जागे होऊन तातडीने कारवाई न केल्यास, कोणत्याही दुर्घटनेची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.




