
पंचनामे करण्यासाठी ग्रामसेवकांना “पालक अधिकारी” म्हणून नेमणूक दिल्याने उफाळला वाद…
अमळनेर : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) यांना “पालक अधिकारी” म्हणून नेमणुकीचे आदेश दिले. परंतु हा आदेश नियमबाह्य, बेकायदेशीर व ग्रामसेवकांवर अन्याय करणारा असल्याचा ठपका ठेवत, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन अमळनेर शाखेने तहसीलदारांविरुद्ध आंदोलनाचा एल्गार पुकारला आहे.
शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार, शेतीपिकांच्या पंचनाम्यासाठी महसूल अधिकारी (तलाठी), मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार आणि कृषी सहाय्यक यांची नियुक्ती करण्याचे अधिकार आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यात तशीच नेमणूक आहे अमळनेर येथे मात्र काही ठिकाणी संयुक्त जबाबदारी न देता अमळनेरमध्ये फक्त ग्रामसेवकांना “पालक अधिकारी” म्हणून नेमल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे.हे काम करण्यास ग्रामसेवक यांनी नकार देताच ६० ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, हे “शासन नियमांना हरताळ फासणारे” असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, तहसीलदार सुराणा यांनी ग्रामसेवकांशी अर्वाच्च भाषेत संवाद साधून मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. “काम केले नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करू,” अशा धमक्या दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. ग्रामसेवकांना सार्वजनिकरित्या अपमानित करण्याचे प्रकार झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.
संघटनेने या नेमणुकीचा आदेश त्वरित रद्द करण्याची मागणी केली असून, “जर आदेश मागे घेतला नाही, तर संपूर्ण तालुक्यातील ग्रामसेवक एकत्र येऊन एल्गार आंदोलन छेडतील,” असा इशारा देण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना, पंचनामे कार्यात ग्रामसेवकांवर दबाव टाकणे अनुचित असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
प्रतिक्रिया
“अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीचे त्वरित पंचनामे करणे अत्यावश्यक आहे. ग्रामसेवक हे गावपातळीवरील प्रमुख अधिकारी आहेत. त्यांना ‘पालक अधिकारी’ म्हणून जबाबदारी देणे म्हणजे समन्वय वाढवणे हा उद्देश आहे. कुठलाही दबाव टाकण्याचा हेतू नाही.” रूपेशकुमार सुराणा, तहसीलदार, अमळनेर
प्रतिक्रिया
आज सुटी असल्यामुळे आदेश प्राप्त झालेला नाही “महसूल आणि पंचायत विभागांमध्ये समन्वय ठेवून शेतकऱ्यांचे हित जपणे हे प्राधान्य आहे. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्टता मागवली जाईल.” एन. आर. पाटील, गटविकास अधिकारी, अमळनेर




